पुणेः येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सामूहिक योगासनांच्या प्रात्यक्षिकांद्वारे गेल्या महिनाभरापासून चालू असणाऱ्या ‘महा’योग उत्सवाचा समारोप करण्यात आला. समग्र विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती घुमटाच्या साक्षीने झालेल्या या योगउत्सवात विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह लोणी-काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीतील शेकडो नागरिकांनी उत्फुर्तपणे सहभाग नोंदवत आपले शरीर सदृढ ठेवण्यासाठी दररोज योग प्रात्यक्षिक करण्याचा निश्चय केला.
भारत सरकारचे आयुष मंत्रालय, आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी संघटना, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान, आर्ट ऑफ लिविंग, सुर्या फाउंडेशन, एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे स्कुल ऑफ हाॅलिस्टिक डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक डाॅ. सुनिता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.मोहित दुबे, डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, कार्यकारी संचालक, एमआयटी एडीटी विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डाॅ.ज्ञानदेव नीलवर्ण, डाॅ.शिवशरण माळी, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.पद्माकर फड, डाॅ.सुराज भोयार आदी याप्रसंगी उपस्थित होते. प्रास्ताविकात बोलताना कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डाॅ.अतुल पाटील यांनी योग दिनाचे निमित्ताने गेल्या महिनाभर आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, योग दिनानिमित्त महिनाभर विद्यापीठाच्या योग प्रशिक्षकांनी लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ व आसपास असणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी रोज सकाळी योग शिबिरे आयोजित केली होती. यासह, विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना, प्रा.डाॅ. कराड म्हणाले, आज केवळ भारतातच नव्हे तर समग्र जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्सवात साजरा होत आहे. योगामुळे केवळ शाररीकच नव्हे तर माणसिक आरोग्य देखील आबाधित राहते. त्याचमुळे, एमआयटी एडीटी विद्यापीठाने मोठ्या उत्साहात हा दिन साजर केला असून, विश्वशांती घुमटाच्या साक्षीने शारीरिक स्वास्थ्य आबादीत राखण्याचा संदेश दिला आहे.
विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.