पुणे: पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील जुन्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर टीएचएस वेलनेस प्रा. लि. यांनी हृदयरोगावर तपासणी आणि उपचाराचा संयुक्त केंद्र सुरू केले आहे. सीजीएचएस दराच्या पाच टक्के कमी दराने हृदयरोगावरील सर्व तपासण्या, उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. हृदयरोगावरील इतर सर्व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. हृदयाची सोनोग्राफी, ईसीजी, स्ट्रेस टेस्ट यासुद्धा शासकीय दरात होतात. या केंद्रात १ लाख ६५ हजार रुग्णांनी येथे तपासण्या, उपचार किंवा शस्त्रक्रिया केल्या आहेत. या केंद्रात राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्य योजना, महापालिकेची शहरी गरीब आरोग्य योजनेचा लाभ घेता येतो.
वैद्यकीय तपासण्या आणि उपचार गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना परवडत नाहीत. त्यामुळे महापालिकेने पद्मावती येथील शिवशंकर पोटे दवाखाना एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि एक्स-रे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर कोथरूड येथील सुतार दवाखाना आणि कमला नेहरू येथील दवाखाना येथे ही वैद्यकीय तपासण्या होत आहेत.
महापालिकेच्या पद्मावती येथील शिवशंकर पोटे दवाखाना, कोथरूड येथील सुतार दवाखाना आणि कमला नेहरू रुग्णालय येथे शासकीय दरापेक्षा (सीजीएचएस) ५ ते ८ टक्के कमी दराने एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे आणि रक्ताच्या विविध चाचण्याचा वर्षभरात सुमारे ५० हजार रुग्णांना फायदा होताे. विशेष म्हणजे शासकीय दरापेक्षा कमी दराने होणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी कुठल्याही कागदपत्राची गरज नाही.
सीजीएचएसदरापेक्षा म्हणजे सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा ५ ते ८ टक्के कमी दराने या तपासणी होत आहेत. एखाद्या रुग्णाला खासगी दवाखान्यांमध्ये एमआरआय करण्यासाठी ५ हजार ४०० रुपये खर्च येत असेल, तर हाच एमआरआय येथे २ हजार १०० रुपयांत होत आहे. एक्स रे करण्यासाठी खासगी रुग्णालयात ४०० रुपये खर्च येतो. या केंद्रामध्ये केवळ ६६ रुपयांमध्ये एक्स रे होतो.
पुणे महापालिकेच्या वतीने शहरी गरीब योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या नागरिकांना वैद्यकीय तपासणी केंद्रामध्ये तपासणीच्या दरावर ५० टक्के सूट मिळते. तसेच, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या म्हणते सीजीएचएस दरापेक्षा ५ ते ८ टक्के कमी दराने वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. त्यासाठी कुठल्याही कागदपत्राची गरज नाही.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.