मुंबई – आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या एलिमिनेटरचा सामना होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात जो संघ विजयी होईल, तो क्वालिफायरच २ चा सामना कोलकाता नाइट रायडर्ससोबत खेळेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहली या सामन्यात मोठा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.
विराट कोहली आज अहमदाबादमध्ये रचणार इतिहास!
विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या आयपीएल करिअरमध्ये ७९७१ धावा केल्या आहेत. जर हा फलंदाज राजस्थान रॉयल्सविरुद्ध २९ धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो ८ हजार धावांचा आकडा गाठेल. अशाप्रकारे विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात ८ हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरणार आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी-
विराट कोहलीची बॅट या मोसमात चांगली कामगिरी करत आहे. या हंगामात आतापर्यंत विराट कोहलीने १४ सामन्यात ६४.३६ च्या सरासरीने आणि १५५.६० च्या स्ट्राईक रेटने ७०८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ५९ चौकार आणि ३७ षटकार मारले आहेत. तसेच, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे.
विराट कोहलीची कारकीर्द-
विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने आतापर्यंत २५१ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ३८.६९ च्या सरासरीने आणि १३१.९५ च्या स्ट्राईक रेटने ७९७१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आयपीएल सामन्यांमध्ये ८ शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने ५५ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहे. अशाप्रकारे विराट कोहली आयपीएलचा १७वा हंगाम खेळत आहे. मात्र, आतापर्यंत विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात अपयश आले आहे.
बंगळुरुने तीनवेळा खेळलाय अंतिम सामना-
बंगळुरुचा संघ तीनवेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात दाखल झाला होता. परंतु बंगळुरुला जेतेपद पटकावण्यात यश मिळाले नाही. यंदा आयपीएलचं पहिलं जेतेपद पटकवण्यासाठी बंगळुरुचा संघ खूप उत्सुक आहे. बंगळुरुने सगळ्यात पहिले २००९ साली अंतिम सामना खेळला होता. यानंतर २०११ आणि २०१६ साली बंगळुरुने अंतिम सामना खेळला होता.