कोव्हिडशील्ड वरुन तर्क-विर्तक लावण्यात येत होते. परंतु या सर्व विषयांना पुर्ण विराम मिळाला आहे. कोरोना लसीची आणि त्याच्यापासून होणाऱ्या दुष्परिणामाची सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती, मात्र आता ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाने कोरोना लसीबाबत स्वत:च कबुली दिली आहे. जागतिक लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने कबूल केले आहे की, ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेल्या कोविड-19 लसीमुळे रक्त गोठणे आणि प्लेटलेट कमी होणे यासारखे दुर्मिळ आजार होण्याची शक्यता आहे. भारतातील लोकांना या लसीचे सुमारे 175 कोटी डोस देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत भारतात ही लस घेणाऱ्या लोकांनी काळजी करण्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत तज्ज्ञांच्या अहवालात दिलासादायक माहिती समोर आली आहे.
भारतात, कोरोनाची लस घेतल्यानंतर लोकांमध्ये होणाऱ्या दुष्परिणामांबाबत एक सरकारी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने टीटीएसशी संबंधित किमान 37 प्रकरणांची चौकशी केली. यापैकी १८ प्रकरणे २०२१ पूर्वी लस घेतलेल्या लोकांशी संबंधित आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की TTS ची नोंद युरोपियन देशांमध्ये साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या काळात झाली होती परंतु भारतात ती फारच दुर्मिळ होती.
लसीकरण मोहिमेवरील चर्चेचा भाग असलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, टीटीएस हा लसीचा अत्यंत दुर्मिळ दुष्परिणाम आहे. हे अजूनही भारतीय आणि दक्षिण आशियाई लोकांमध्ये युरोपीय लोकांपेक्षा दुर्मिळ आहे. लसीने लोकांचे प्राण वाचवले आहेत याचे पुरेसे पुरावे आहेत. या प्रकरणात त्याचे फायदे टीटीएस प्रकरणांपेक्षा बरेच मोठे आहेत.