खारघर – पंजाब व हरियाणा या राज्यांतून येऊन नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पनवेल परिसरात स्थायिक झालेल्या पंजाबी व हरियाणवी बांधवांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना आज (रविवारी) पाठिंबा जाहीर केला.
कळंबोली येथे पंजाब-हरियाणा निवासी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवदास कांबळे, माजी नगरसेवक राजू शर्मा तसेच परेश पाटील, हॅपी सिंग, जसपाल सिंग सिद्धू, हरविंदर सिंग, सितू शर्मा, परमजीत सिंग, निशांत गिल यांच्यासह पंजाबी व हरियाणवी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बरेच पंजाबी व हरियाणवी बांधव वाहतूक व्यवसायात असल्यामुळे खासदार बारणे यांनी त्यांच्या भाषणात रस्त्याशी निगडित उदाहरणे दिली. देशाच्या प्रगतीच्या रस्त्यावरील साठ वर्षातील खड्डे दहा वर्षांत बुजवण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले, असे ते म्हणाले. जेएनपीटी रस्त्यावर पूर्वी चार-चार तास रांगेत उभे राहावे लागायचे, आता त्या ठिकाणी आठ पदरी रस्ता झाला आहे. मुंबईला जाण्यासाठी समुद्रावर अटल सेतू बांधण्यात आला आहे. पुणे-मुंबई प्रवास अधिक सुखकर व जलद होण्यासाठी मिसिंग लिंकचे कामही अंतिम टप्प्यात आहे. या सर्व प्रकल्पांमुळे केवळ वेळच नाही तर पेट्रोल व डिझेलही वाचणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी ठेवून काम करतात. 2047 पर्यंत भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने त्यांचे नियोजन आहे. संपूर्ण जगात भारताची मान उंचावून त्यांनी समस्त भारतीयांचा आत्मविश्वास वाढवला आहे, असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सत्ता गमावल्यामुळे व नजिकच्या भविष्यात पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नसल्यामुळे विरोधकांमध्ये नैराश्य आले आहे. त्यामुळे खोटे आरोप व आंदोलने करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. पण सूज्ञ मतदार त्याला बळी पडणार नाही.
ढोलांच्या ठेक्यावर भांगडा करीत पंजाबी व हरियाणवी बांधवांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. खासदार बारणे यांना तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.