पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारकडून विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. आता पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशने यासाठी ‘व्होट कर पुणेकर’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान करणाऱ्या नागरिकांना एक लिटर ऑईल खरेदीवर ५० रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जाणार आहे.
पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेने महा एनजीओ फेडरेशन आणि इतर स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन ‘व्होट कर पुणेकर’ मोहीम हाती घेतली आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी मतदार जागृतीसाठी उपक्रम राबविण्याचे आम्हाला आवाहन केले होते. त्यानुसार ही मोहीम सुरू करण्यात येत आहे. पुण्यातील पेट्रोल पंपचालक मतदान करणाऱ्या नागरिकांनी बोटावरील शाई दाखविल्यानंतर एक लिटर ऑईल खरेदीवर त्यांना ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देणार आहेत. ही मोहीम २० मेपर्यंत सुरू असणार आहे.
याचबरोबर असोसिएशन घरोघरी जाऊन मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठीही मदत केली जाणार आहे. याचबरोबर मतदानादिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना २० हजार पाण्याच्या बाटल्या वितरित केल्या जाणार आहेत, असे रुपारेल यांनी सांगितले.
या मोहिमेची घोषणा असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आली. हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजय शास्तारे, पांडुरंग शेळके, महा एनजीओ फेडरेशनचे शेखर मुंदडा आणि पीसीपीआरचे मनोज पोचट उपस्थित होते. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सातशे साधक उपस्थित होते.