पंढरपूर :- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न होणार असून, या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. या महापूजेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच इतर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, मंदिर समितीचे व सल्लागार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित असतात.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांनी नियोजन आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मानाच्या पालखीच्या विश्वस्तांनी शासकीय महापूजेसाठी मंदिर समितीकडून निमंत्रण मिळावे अशी मागणी केली होती. त्यावर मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी त्यांची मागणी मान्य करून, या प्रमुख 10 मानाच्या पालख्यांना प्रत्येकी दोन निमंत्रण पत्रिका देऊन सन्मानपूर्वक शासकीय महापूजेला आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत निवृत्ती महाराज, श्री संत सोपान देव महाराज, श्री संत मुक्ताई, श्री संत नामदेव महाराज, श्री विठ्ठल रुक्माई संस्थान कौंडण्यपूर, श्री संत चांगावटेश्वर महाराज, श्री संत निळोबाराय महाराज या प्रमुख 10 मानाच्या पालख्यांचा समावेश आहे.