एकीचे पालकाचे छत्र हरवलेले (आई घरकाम करुन मुलीला शिकवते), तर दुसरीच्या घरची परिस्थिती गरिबीची (पौरोहित्य कुटुंबातील लेक), अशा परिस्थितीत देखील आपल्यावरचे संस्कार जपत शिकण्याची जिद्द, मोठे होण्याची महत्वाकांक्षा!!
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधुन या मुलींना नवीन सायकली भेट स्वरूपात दिल्या, तसेच या मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले व मुलगी शिकली तरच प्रगती होईल हा संदेश समाजापुढे मांडला.

नांदेड सिटी भागात झालेल्या कार्यक्रमाला भाजप प्रदेश प्रवक्ता व उद्योजक श्री संदीप खर्डेकर, महाराष्ट्र टाइम्स चे वृत्तसंपादक श्री श्रीपाद ब्रह्मे मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित होते.
प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या मुलींना एक आवश्यक मदत करुन उत्तम आदर्श अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने लोकांपुढे मांडला असे प्रतिपादन ब्रह्मे यांनी केले, तसेच या शैक्षणिक प्रगतीच्या मार्गात कुठल्याही धर्म प्रांत याचा विचार न करता एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहॆ असे सांगितले.
संदीप खर्डेकरांनी, महासंघाच्या पुणे जिल्ह्यातील कार्याचे कौतुक केले व क्रीएटिव फौंडेशन तर्फे सामाजिक उपक्रमांसाठी स्पीकर सेट भेट स्वरूपात दिला. मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व वैद्यकीय मदतीसाठी आवश्यक सर्व मदत करण्याचे आश्वासन देखील या निमित्ताने दिले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी असे शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांचे स्किल डेव्हलोपमेंट यावर भर देत आगामी वर्षात अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम महासंघातर्फे राबवले जातील असे सांगितले व यासाठी दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात आले.
पर्यावरण अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, महिला आघाडी अध्यक्ष केतकी कुलकर्णी यांनी महासंघ घेत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, पदाधिकारी नितीन फडणीस यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला नांदेड सिटी शाखा, वारजे शाखा, सिंहगडरोड शाखा, धायरी शाखा मधुन अनेक पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
नवीन सायकल मिळाल्याचा आनंद मुलींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आपल्या उपक्रमांच्या यादीत अजुन एक यशाची गुढी उभारली असे म्हणता येईल.