औंध, : “मोठी स्वप्ने पाहा, नव्या संधी शोधा आणि सिद्ध करा की शिक्षण हे केवळ प्रमाणपत्र मिळवण्यापुरते नाही, तर उज्वल भविष्यासाठीचा मार्ग आहे,” असे प्रेरणादायी विचार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे माजी मुख्य अभियंता प्रल्हाद साळुंखे यांनी व्यक्त केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ औंधचे अध्यक्ष राजेंद्र शेलार होते. प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, उपप्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा. डॉ. तानाजी हातेकर, प्रा. सुशील गुजर, डॉ. रेश्मा दिवेकर यांच्यासह शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश
पुढे बोलताना साळुंखे म्हणाले, “शिक्षणाचा हा टप्पा ‘The End’ नसून ‘To Be Continued’ आहे. शिकणे कधीही थांबवू नका, कारण आयुष्यभर शिकणारेच पुढे जातात. मेहनत, समर्पण आणि सातत्य यामुळेच तुम्ही यशस्वी व्हाल.”
सामाजिक योगदान आणि जबाबदारीचे महत्त्व
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र शेलार यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण आणि सामाजिक योगदानाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. “आपले शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी. रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात आणि विद्यार्थ्यांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे ते म्हणाले.
६०० हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी प्राचार्य आंधळे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. “आज ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि विविध क्षेत्रांतील विशेष कामगिरीबद्दल पारितोषिके प्रदान करण्यात येत आहेत. आपल्या मेहनतीला मिळणाऱ्या या सन्मानाचे चीज करून यशाच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करा,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात प्रा. सुशील गुजर यांनी शैक्षणिक पारितोषिकांचे, डॉ. रेश्मा दिवेकर यांनी सांस्कृतिक पारितोषिकांचे, तर प्रा. सौरभ कदम यांनी क्रीडा पारितोषिकांचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी केले, तर डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.