चिंचवड :- आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छांऐवजी पुस्तक देण्याच्या अभिनव उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत, एकूण ६,८४२ पुस्तके जमा झाली. दिवसभरात जमा झालेल्या या पुस्तकांची संध्याकाळी ‘बालजत्रा’ कार्यक्रमात तुला करण्यात आली. ही सर्व पुस्तके चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाचनालयांना मोफत देण्यात येणारआहेत.
या विशेष दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी ७ वाजता पिंपळे गुरव येथील महादेव मंदिरात अभिषेक, तर ८ वाजता संपूर्ण चिंचवड मतदारसंघात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला.संतोष कांबळे यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आणि लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर सकाळी ९ वाजता निळू फुले प्रेक्षागृहात भाजपा कायदा आघाडी व सीए आघाडीच्या वतीने संविधान विधी सेवा सल्ला केंद्र, सीए मोफत सल्ला केंद्र आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ॲड. गोरखनाथ झोळ व सीए बबन डांगले आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दुपारी १२ वाजता पाणीटंचाईवर उपाय म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात पाणपोई उघडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी काळूराम बारणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकाळी ११ वाजता प्रसिद्धीप्रमुख स्वयम बारी यांनी निर्मिती केलेल्या “शंकरपर्व” अभिष्टचिंतन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
आरोग्यसेवा उपक्रमांतर्गत १० वाजता थेरगाव, औंध आणि तालेरा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. हे उपक्रम प्रसाद कस्पटे, सोमनाथ भोंडवे आणि संदीप नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
अनाथ आणि दिव्यांग संस्थांमध्ये – ममता अंध अनाथ कल्याण केंद्र, झुंज दिव्यांग संस्था आणि माई बालभवन, रावेत येथे – धान्यवाटपाचे आयोजन करण्यात आले. संजय मराठे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. संध्याकाळी ५ वाजता क्रांतिवीर चापेकर गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे मोरेश्वर शेडगे हे प्रमुख होते.
संध्याकाळी ६ वाजता पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात ‘पुस्तकतुला – बालजत्रा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छाऐवजी पुस्तकांची अपेक्षा ठेवण्यात आली होती. नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी व विविध संस्था यांनी या अभिनव उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. दिवसभरात जमा झालेल्या ६,८४२ पुस्तकांची या कार्यक्रमात औपचारिक ‘तुला’ करण्यात आली असून, ही पुस्तके लवकरच मतदारसंघातील विविध वाचनालयांना मोफत देण्यात येणार आहेत.