पुणे : पुणे मेट्रोने आपल्या सेवेला मिळणारा प्रतिसाद आणि नागरिकांचा वाढता सहभाग यामुळे जून महिन्यात प्रवाशांच्या संख्येचा नवा उच्चांक गाठला आहे. एकट्या जून महिन्यात तब्बल ५२ लाख ५७ हजार प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक प्रवासी संख्या आहे. पुणे मेट्रोने एका महिन्यात ५० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला असून, दररोज सरासरी ७० हजारांहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत.
दोन मार्ग, वाढता प्रतिसाद
महामेट्रोच्या वतीने सध्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मुख्य मार्गांवर मेट्रो सेवा सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रवासीसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, विशेषतः सणासुदीच्या दिवशी हा आकडा लाखोंच्या घरात जात आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी एकाच दिवसात ३.४६ लाख प्रवाशांनी मेट्रोचा वापर केल्याची नोंद आहे.
उत्पन्नातही लक्षणीय वाढ
जून महिन्यात पुणे मेट्रोला २.३३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मे महिन्यात प्रवासी संख्या होती ४७.६२ लाख आणि उत्पन्न होते २.७२ कोटी रुपये. यावरून प्रवासी आणि उत्पन्न या दोन्ही क्षेत्रांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकट
महिना | प्रवासी संख्या | उत्पन्न |
---|---|---|
मे | ४७,६२,००० | ₹२.७२ कोटी |
जून | ५२,५७,००० | ₹२.३३ कोटी |
विस्तार प्रकल्पांना मंजुरी : नवा टप्पा लवकरच
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन महत्वाच्या विस्तारीत मार्गांना केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. वनाज ते चांदणी चौक (मार्ग २A) आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी (वाघोली) या मार्गांमध्ये पुणे मेट्रोचा विस्तार होणार आहे. या प्रकल्पांवर ३,७५६.५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, केंद्र व राज्य सरकारचा प्रत्येकी २० टक्के वाटा, तर उर्वरित ६० टक्के निधी कर्जाच्या स्वरूपात महा-मेट्रोकडून उभारला जाणार आहे.
वनाज–चांदणी चौक या मार्गिकेची लांबी १.२ किमी असून, कोथरूड बस डेपो व चांदणी चौक अशी दोन नवीन स्थानके यात असतील. हा विस्तार कोथरूड–पश्चिम पुणेकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे, रामवाडी–विठ्ठलवाडी (वाघोली) मार्गामुळे पूर्वेकडील आयटी हब मेट्रोशी जोडले जाणार आहेत.
वाहतूक कोंडीवर उपाय, वेगवान प्रवासाचे स्वप्न साकार
या निर्णयामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार असून, सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होणार आहे. लवकरच या प्रकल्पांसाठी टेंडर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मेट्रोचा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय एक मोठा सकारात्मक पाऊल ठरणार आहे.