पुणे – मी शास्त्रज्ञ आहे, यामुळे मला अनेकदा सर्वात चांगले इक्वेशन कुठले असे अनेकदा विचारतात, त्यावेळी मी कोणतेही प्रस्थापित असलेले उत्तर देत नाही, कारण मला वाटते की शिक्षण आणि त्यातून घडणारे भविष्य हेच जगातील सर्वात मोठे आणि महत्वाचे इक्वेशन आहे. आज ए आय मुळे नोकऱ्या जातील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, बदलत्या तंत्रज्ञानामुळे अनेक बदल होणार, रोजगाराचे स्वरूप बदलणार हे निश्चित, मात्र त्याला घाबरून न जाता आपल्या शिक्षणात भविष्याचा विचार होणे गरजेचे असून त्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करावा लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणार तिसरा “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2024” आज डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ज्येष्ठ मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. माशेलकर बोलत होते. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच यावेळी ‘श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती 2024’ इतिहास अभ्यासक (सातारा) प्रदीप संजय पाटील यांना प्रदान करण्यात आली. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 50 हजार रुपये रोख असे शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. सिम्बॉयसिस विश्वभवन सभागृह येथे आयोजित या सोहळ्याला महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष, कुंडलीक कारकर, माजी खासदार प्रदीपदादा रावत, अमृतराव पुरंदरे, पत्रकार सागर देशपांडे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी सागर देशपांडे यांनी डॉ. रघुनाथ माशेलकरांची जाहीर मुलाखत घेतली त्यामध्ये डॉ. माशेलकर म्हणाले, शिक्षण म्हणजे भविष्य आहे. आपल्या समाजात आज शिक्षकांना प्रतिष्ठा दिली जात नाही हे धोक्याचे लक्षण आहे, कारण ज्या समाजात गुरूला चांगले स्थान नाही त्यांची प्रगती होत नाही. बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने दिला जाणार हा सन्मान मला आजवर मिळालेल्या सर्व सन्मानात सर्वश्रेष्ठ असल्याचेही नमूद करत डॉ. माशेलकर यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य खेड्यापाड्यात आणि देश-विदेशात पोहोचवण्याचे कार्य बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं. इतिहासाचा अभ्यास करताना मला लक्षात आले की शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या बरोबरीचा एकही राजा नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य केवळ शिवरायांनी दाखवलं. त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या अलौकिक गोष्टी घडल्या त्या सगळ्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर घडलेल्या आहेत. त्यामुळे किल्ल्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी अधिक जागरूक राहून किल्ल्यांचा अभ्यास केला पाहिजे.
प्रदीप रावत म्हणाले, समाजाची प्रगती होण्यासाठी एक तर त्यांच्या भौतिक गोष्टी समृद्ध झाल्या पाहिजेत किंवा नैतिकदृष्ट्या तो उन्नत होत गेला पाहिजे. आपला समाज प्राचीन आहे. मात्र आधुनिक काळामध्ये भारतात जे प्रबोधन युग घडले त्यातूनच आज बदललेला भारत आपल्याला दिसत आहे. भारतातील प्रबोधन काळ, कठोर धर्म चिकित्सा, भारताचे संविधान हे प्रबोधन युगाची उत्पत्ती आहे. भारताचा जो आधुनिक चेहरा मोहरा आहे तो शिवाजी महाराजांमुळे टिकून आहे. स्वातंत्र्यासाठी 1000 वर्ष वेगवेगळ्या प्रकारे लढा देणारा भारत हा एकमेव देश आहे. अनेकांचा असा समज आहे की भारताला ब्रिटिशांची देणगी आहे. पण तीच देणगी पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार यांना देखील मिळालेली आहे. मग त्यामध्ये भारतच चांगला कसा? कारण इथले नागरिक इथली संस्कृती इथला समाज हा सहिष्णू समाज आहे. मात्र भारतात जो प्रबोधन काळ घडला तो भारतीय उपखंडात घडला नाही; तर येथे शांतता राहणार नाही. भारताचा इतिहास हा सहिष्णुता टिकवून ठेवण्यासाठी कसा गरजेचा आहे, याचा अभ्यास व्हायला हवा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानचे सचिव अभिषेक जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, विशाल सातव यांनी आभार मानले.