पुणे- महाराष्ट्र हे देशातील एक आर्थिक केंद्र आहे. महाराष्ट्राचा विकास अत्यंत होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अटल सेतू, समृद्धी एक्सप्रेसवे, समुद्री महामार्ग, मेट्रो यांसारखे अनेक मोठे प्रकल्प राज्यात कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे भारत हा विकसित देश बनत असताना महाराष्ट्र त्यामध्ये मोठी भूमिका निभावणार आहे, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी व्यक्त केला.पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी महाविद्यालयात ‘विकसित भारत ॲम्बेसेडर – युवा कनेक्ट’ उपक्रमाअंतर्गत आज आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हरदीप सिंह पुरी बोलत होते. ‘विकसित भारत ॲम्बेसेडर – युवा कनेक्ट’ उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासंदर्भात तरुणांचा सहभाग आणि जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.याप्रसंगी, माईर्स एमआयटी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू मंगेश कराड, निबंधक महेश चोपडे, तिरंदाजी खेळाडू आदित्य केदारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर, लक्ष्य चिंकारा यांनी केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत पोर्टलविषयी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली व येथे नोंदणी करण्याचे आवाहन केले. दरम्यान, युथ आयकॉन म्हणून आदित्य केदारी यांनीही इंजिनिअर ते कायद्याचे प्राध्यापक ते तिरंदाजी खेळाडू असा आपला प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मंगेश कराड यांनी एमआयटी संस्थेच्या विविध समाजोपयोगी कार्याची माहिती सर्वांना दिली.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आपल्या बीज भाषणात पॉवर पॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना भारताची विकसित देश बनण्याच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल समजावून सांगितली.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले की पुणे शहर हे आपल्या अत्यंत आवडीचे शहर आहे. या शहराला सावित्रीबाई फुले यांच्या रूपाने मोठा वारसा लाभलेला आहे. यामुळेच महाराष्ट्र महिला शिक्षणाच्या बाबतीत देशात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात सामाजिक विकासाबरोबरच आर्थिक प्रगतीही वेगाने झाली. याच्या बळावर महाराष्ट्र हे देशातील एक महत्वाचे आर्थिक केंद्र म्हणून उदयाला आले. देशाला विकसित बनवण्यासाठी महाराष्ट्र उल्लेखनीय कामगिरी करेल, असेही त्यांनी म्हटले.
हरदीप सिंह पुरी पुढे म्हणाले की 2014 पूर्वी भारताची अर्थव्यवस्था ही जगात दहाव्या स्थानी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात केवळ गेल्या 10 वर्षांत भारत जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून 2027 पर्यंत भारत देश हा जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल.