पुणे येथे दिमाखदार सोहळ्यात निर्माते कृष्णा पांढरे व सौ. सुनीता पांढरे यांच्या “गीताई प्रॉडक्शन्स” या निर्मिती संस्थेची घोषणा करण्यात आली. तसेच याच सोहळ्यात गीताई प्रॉडक्शन्सची पहिली कलाकृती “द रॅबिट हाऊस” या हिंदी चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी निर्माते कृष्णा पांढरे, निर्मात्या सुनीता पांढरे, लेखक व दिग्दर्शक वैभव कुलकर्णी, कलाकार अमित रियान, करिश्मा, पद्मनाभ, गगन प्रदीप, सुरेश कुंभार, पूर्वा, योगेश कुलकर्णी, डी.ओ.पी. प्रतीक पाठक, रंगभूषाकार सुरेश कुंभार, वेशभूषाकार प्रणोती पाठक, सहछायालेखक अभि हजारे, पब्लिसिटी डिझाईनर सौरभ जनवाडे, साऊंड डिझायनर संकेत धोटकर, डॉन स्टुडिओजचे चिराग गुजराथी यांसोबत प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
निर्माते कृष्णा पांढरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले “मला चित्रपटाची खूप आवड असल्याने चित्रपटसृष्टीबद्दल आकर्षण होतं, परंतु व्यवसायात व्यग्र असल्याने मी या बाबतीत फारसा गांभीर्याने विचार केला नव्हता. एका व्यावसायिक भेटी दरम्यान लेखक वैभव कुलकर्णी यांनी मला या चित्रपटाची कथा ऐकवली जी माझ्या मनाला खूप भावली व त्याक्षणी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवायचे पक्के केले आणि गीताई प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली. माझ्या आईचे नाव गीताई व तिच्या नावाने एक नवीन व्यवसाय सुरु करण्याची माझी इच्छा होती त्यामुळे या निर्मिती संस्थेला “गीताई प्रॉडक्शन्स” असे नाव दिले. माझी पत्नी सुनीता हिने “गीताई प्रॉडक्शन्स”ची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन “द रॅबिट हाऊस” या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली.”
दिग्दर्शक वैभव कुलकर्णी यांनी “या चित्रपटाच्या संपूर्ण प्रक्रियेत निर्माते श्री. व सौ. पांढरे आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. बजेटची चिंता करु नका असे सांगतानाच आपली कलाकृती उच्च दर्जाची झाली पाहिजे असा आत्मविश्वास आम्हाला दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.” असे मत व्यक्त केले. कलाकार आणि तंत्रज्ञ यांची पत्रकार विनोद घाटगे यांनी एक छोटेखानी मुलाखत घेऊन कार्यक्रमात रंग भरले तर सूत्रसंचालन अमृता सुरेश हिने केले.
गीताई प्रॉडक्शन्स निर्मिती “द रॅबिट हाऊस” या हिंदी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन वैभव कुलकर्णी यांचे असून त्यांनी चित्रपटाचे संकलन सुद्धा केले आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हिमाचल प्रदेश येथे झाले असून तेथे द रॅबिट हाऊस हे 120 वर्षे जुने घर आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण आहे त्या वैशिष्ट्यांचा वापर या चित्रपटाच्या कथेमध्ये केला आहे. ही वास्तू होम स्टे साठी प्रसिद्ध आहे. या चित्रपटात पद्मनाभ, अमित रियान, करिष्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पद्मनाभ याने गायक, संगीतकार आणि अभिनय अशी तिहेरी कामगिरी केली आहे.
गीताई प्रॉडक्शन्स निर्मिती “द रॅबिट हाऊस” या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या उत्कंठावर्धक पोस्टरमुळे प्रेक्षकांना काहीतरी वेगळे आणि नवीन अनुभवता येणार आहे अशी खात्री आहे.