पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पुणे केंद्रात बाजी मारणाऱ्या म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘बस नं. 1532’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीला सुरुवात झाली.
महाअंतिम फेरीत पाच विभागातील एकूण 19 संघांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळच्या सत्रात म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणेच्या ‘बस नं. 1532’चे आणि न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगरच्या ‘देखावा’ या एकांकिकांचे सादरीकरण झाले. तर सायंकाळच्या सत्रात श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (डेडलाईन), संत राऊळ महाराजा महाविद्यालय, कुडाळ (ऑफलाईन), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (बट बिफोर लिव्ह), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (रंगवास्तू) यांचे सादरीकरण झाले.