पुणे : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राच्या वतीने सायली मराठे, संजय नाईक, श्रेयस कुलकर्णी, पल्लवी डबीर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर अक्षदा वैद्य, सार्थक फडके, युग शेवाळे, गंधाली शिरोळकर, निरंजन कुलकर्णी या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.
केंद्राच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, विद्यार्थी शिष्यवृत्ती व मराठी,संस्कृतमध्ये पीएचडी, एम.ए.,बी.ए. करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. बाजीराव रस्त्यावरील वरदश्री सभागृहात हा सत्कार समारंभ झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ.रोहित टिळक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे केंद्राचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु आहे. यावेळी मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष कुंदनकुमार साठे, कार्यवाह विश्वनाथ भालेराव, शैक्षणिक प्रमुख राजेंद्र देवधर, केंद्रप्रमुख मकरंद माणकीकर, सुजाता मवाळ, सुवर्णा रिसबूड, उल्हास पाठक, शिरीष आठल्ये, अनिल शिदोरे, मुकुंद जोशी, संयोगिता पागे, माधव ताटके, शारंगधर अभ्यंकर, भालचंद्र खाराईत हे संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ४१ विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच संस्कृत व मराठीमध्ये विशेष नैपुण्य मिळालेले विद्यार्थी डॉ. सुनीला गोंधळेकर, वैष्णवी दिघे, प्रथमेश बिवलकर, सिरा आठवले, प्रीती शिरोलीकर,डॉ. संतोष काशीद, अश्विनी रानडे, अभिरुची ज्ञाते, प्रियंका कोंढाळकर, मयुरी नाईक यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला.
डॉ. रोहित टिळक म्हणाले, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राच्या वतीने चांगले शिक्षण देणारे शिक्षक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो, त्यामुळे हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मागील १८ वर्षांपासून केंद्राचा शैक्षणिक उपक्रम सुरू आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेने समाजात दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. समाजात ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना मदत करायला हवी. सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणे हे आपले कर्तव्य आहे. समाजातील प्रत्येकाला शिक्षण मिळायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
मकरंद माणकीकर यांनी स्वागत केले. विश्वनाथ भालेराव यांनी संस्थेचा परिचय करून दिला. कुंदनकुमार साठे, राजेंद्र देवधर यांनी मनोगत व्यक्त केले. ऋतुजा मराठे यांनी सूत्रसंचालन केले. मधुरा कुलकर्णी यांनी आभार मानले.