पुणे : अमनोरा येस फाउंडेशनच्या वतीने पुणे शहरात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तब्बल १०२ कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित केल्याबद्दल युई लाईफ सायन्सेस इंडिया यांच्या वतीने फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.
फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला युई लाईफ सायन्सेस च्या गौरी नवलकर-गोडसे, सुमेधा कुशवाहा, गंधाली देसाई, अमनोरा येस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन अनिरुद्ध देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, पुणे शहरातील आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या महिला, स्वच्छ च्या कर्मचारी महिला, घरकाम करणाऱ्या महिला यांसह विविध स्तरातील महिलांसाठी फाउंडेशन च्या वतीने कर्करोग तपासणी शिबिर राबविण्यात आली आहेत. २०१६ पासून कर्करोग तपासणी शिबिरे फाउंडेशनच्या वतीने आयोजित केली जातात. कर्करोगाचे निदान झालेल्या ज्या महिलेची उपचारासाठी आर्थिक परिस्थिती नाही त्या महिलांना उपचारासाठी सहाय्य केले जाते. आतापर्यंत ४० पेक्षा जास्त महिलांना शिबिरामधून कर्करोगाचे निदान झाले आहे. अनेक महिलांनी उपचार घेऊन कर्करोगावर मातदेखील केली आहे.
अमनोरा येस फाउंडेशन च्या वतीने आरोग्य विषयक अनेक शिबिरे राबविण्यात येतात. यामध्ये डोळे तपासणी शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, मोकळा श्वास हा माझा अधिकार, सीपीआर ट्रेनिंग असे उपक्रम आहेत. गरजूंना उपचार देखील फाउंडेशनच्या माध्यमातून दिले जातात.
खामगाव येथील पारधी आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सहाय्य तसेच अवंतिका क्लबच्या माध्यमातून पाणी बचतीचे प्रशिक्षण घरकाम करणाऱ्या महिलांना देण्यात येते.