पुणे : ज्येष्ठ भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी पुणेकरांना नेमके काय दिले या माहितीपेक्षा या मतदारसंघात विद्वेष पसरवणारी भाषा केली. त्याद्वारे त्यांनी कसबा मतदारसंघातील धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचेच काम केले आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काल झालेल्या फडणवीस यांच्या सभेतील आरोपाचा मुद्देसूद समाचार घेतला. धंगेकर म्हणाले की, पुण्याचा कसबा मतदार संघ हा सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदणारा मतदारसंघ आहे. वर्षानुवर्षे येथील सामाजिक सलोखा टिकून आहे. पण येथे धार्मिक विद्वेषाचा खडा टाकून फडणवीस यांनी हे वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. तथापि, त्यांच्या या प्रयत्नांना येथील मतदार जराही भिक घालणार नाहीत. निवडणुका येतात आणि जातात पण अशा विद्वेषाच्या भावनेतून मनावर ओरखडे उमटवणारा प्रचार केला गेला तर त्याचा समाजमनावर विपरीत परिणाम होतो ही बाब भाजपच्या नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे.या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा पराभव होत असल्याची जाणीव झाल्यानेच त्यांनी हा प्रयत्न केला असावा असे मतही धंगेकर यांनी व्यक्त केले.फडणवीस यांनी आपल्यावर व्यक्तिगत टीका करताना, आपण नाटक करतो किंवा आपण नाटकी आमदार आहोत अशी भाषा वापरली आहे. पुण्यातील ड्रग रॅकेट प्रकरण, पोरशे कार अपघात प्रकरण, आणि बेकायदेशीर पब प्रकरण या प्रकरणी मी पोटतिडकीने आवाज उठवला. त्याबाबत पोलीस यंत्रणा आणि सरकारी यंत्रणांना कारवाई करण्यास भाग पाडले. या प्रश्नांबरोबरच या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नाबाबत मी सातत्याने आवाज उठवला, माझी ही कृती जर फडणवीस यांना नाटक वाटत असेल, तर मी हे नाटक या पुढील काळातही करत राहीन, असे प्रत्युत्तरही धंगेकर यांनी यावेळी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुण्यातील प्रमुख दीपक मानकर यांनी धंगेकर यांच्यावर केलेल्या आरोपावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धंगेकर म्हणाले की दीपक मानकर यांना भाजपच्या पुढे कसे गुडघे टेकायला लागले, आणि त्यांना कशामुळे तुरुंगवास भोगावा लागला, त्यांचे आजवरचे बाकीचे उद्योग काय होते, याविषयी मी बोलण्याची गरज नाही. समस्त पुणेकरांना त्यांच्या एकूणच उद्योगा़ची चांगली माहिती आहे. त्यांनी माझ्यावर जे आरोप केले त्याविषयी त्यांच्याशी समोरासमोर कोठेही बसून जाहीर चर्चा करायची आपली तयारी आहे असेही धंगेकर यांनी म्हटले आहे. मागील निवडणुकीत दीपक मानकर तोंड देखले आपल्याबरोबर होते. जेव्हा ते प्रचाराला बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी त्यांना भाजपकडून निरोप जायचे आणि ते पुन्हा शांत बसायचे. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या पाठिंब्याचा आपल्याला उपयोग झाला नाही, आणि यावेळी ते विरोधात असले तरी त्यातून आपल्याला अजिबात नुकसान होणार नाही असा दावाही धंगेकर यांनी केला.
चौकट :
धंगेकर यांना फडणवीस यांनी नाटकी म्हणणे भाजपला पडणार महागात
गेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कसबा मतदारसंघात प्रचार करताना आणि पत्रकारांशी बोलताना ‘हू इज धंगेकर?’ असा प्रश्न विचारून आमदार रवींद्र धंगेकर यांची अवहेलना करण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न कसबा मतदारसंघातील नागरिकांना आवडला नाही. त्यामुळे मतदारांनी धंगेकर यांच्या बाजूने हिरिरीने मतदान करून पोटनिवडणुकीत धंगेकर यांना निवडून आणले. आता फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रचारात धंगेकर यांना नाटकीपणाची उपमा दिली आहे, ते नाटक करतात असे म्हटले आहे. फडणवीस यांचे हे विधानही चंद्रकांत पाटील यांच्या विधानाप्रमाणेच आता कसबा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला महागात पडणार आहे असे प्रतिपादन धंगेकर यांच्या समर्थकांनी केले आहे.