पुणे…… कसबा विधानसभा मतदारसंघातील आपल्या पक्षातर्फे कोणाला उमेदवारी द्यावी याविषयी भाजपामध्ये कमालीची गोंधळाची स्थिती अनुभवायला मिळाली. आणि शेवटी उशिराने त्या पक्षाने गेल्या वेळी पराभूत झालेल्या उमेदवारालाच पुन्हा उमेदवारी दिली, त्यामुळे भाजपमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघात सध्या जी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे ती काँग्रेसच्या पथ्यावरच पडली असून काँग्रेसचा तेथील विजय अधिक सोपा झाला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी केले.
या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या एका निवेदनात मोहन जोशी यांनी म्हटले आहे की कसबा हा आमचा बालेकिल्ला आहे अशा फुशारकीने वागून भाजपने येथील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्षच केले. भाजपच्या या अहंकाराचा फुगा कसबा येथील मतदारांनी पोट निवडणुकीत फोडला. 25 – 30 वर्ष कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भाजपचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवला, आज ना उद्या परिस्थिती सुधारेल अशी या मतदारांची अपेक्षा होती पण त्यांच्या पदरी निराशाच आली. भाजपाला आमदारकी बरोबरच खासदारकी आणि मंत्रीपदेही मिळाली पण कसबेकरांच्या पाठीशी लागलेले समस्यांचे शुक्लकाष्ठ काही संपले नाही. मात्र त्याच वेळी केवळ सोळा महिन्यांसाठी रवींद्र धंगेकर यांनी येथून आमदारकीची संधी मिळाल्यानंतर या मतदारसंघात कसे काम होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे मतदारांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. रवींद्र धंगेकर यांना पूर्ण पाच वर्षासाठी निवडून दिले तर त्याचा आपल्या मतदारसंघातील सर्वांनाच लाभ होईल याची जाणीव येथील सर्वच घटकातील लोकांना झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील समाजाचे सर्वच घटक धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि पोटनिवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने धंगेकर यांना यंदा निवडून येणार आहेत असा विश्वासही मोहन जोशी यांनी व्यक्त केला. स्मार्ट सिटीच्या नावाने पुणेकरांची फसवणूक झाली, नदी सुधार प्रकल्पाच्या नावाने पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली गेली. प्रत्येक निवडणुकीत भाजपने नवनवीन थापा मारल्या. त्यांना पुण्यात शतप्रतिशत यश हवे होते, तेही पुणेकर मतदारांनी त्यांना दिले पण मतदारांच्या पदरात केवळ आणि केवळ निराशाच आली आहे. त्यामुळे आता भाजपला धडा शिकवण्याचा चंग पुणेकरांनी विशेषतः कसबा मतदार संघातील नागरिकांनी बांधला आहे असेही मोहन जोशी यांनी म्हटले.
दरम्यान सकाळी महाविकास आघाडी इंडिया फ्रंट आणि मित्र पक्षांचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती, पासोड्या विठोबा, सिटी पोस्ट, दगडी नागोबा, डुल्या मारुती, दूध भट्टी आदि भागातून पदयात्रा काढली. याही पदयात्रेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष आणि अन्य मित्र पक्षांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रोहित टिळक, जयसिंग भोसले, विशाल धनवडे, राजेंद्र शिंदे, शिवराज भोकरे, संतोष भुतकर, संदीप आटपाळकर, प्रवीण करपे , गौरव बोराडे , सुरेश कांबळे, गणेश नलावडे, दीपक जगताप इत्यादी सहभागी झाले होते.