पुणे : वयाच्या १७ व्या वर्षी अत्यंत कठीण घनपाठाचे अत्युत्कृष्ट पारायण करणाऱ्या श्रीनिधी धायगुडे याचा सन्मान सदाशिव पेठेतील ब्राह्मण कार्यालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी त्याचे माता-पिता वेदमूर्ती स्वानंद धायगुडे आणि स्वाती धायगुडे यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी ब्राह्मण कार्यालयाचे अध्यक्ष गोपाळ गोसावी, उपाध्यक्ष रमेश भागवत, अजिंक्य गोडसे, विश्वस्त विनायक गोखले, सचिव अनिल एरंडे उपस्थित होते. रोख दक्षिणा, सोवळं -उपरणे, श्रीफळ आणि आईचा साडी देऊन सन्मान करण्यात आला.
स्वानंद धायगुडे म्हणाले, वेदांचे अध्ययन कठीण आहे. परंतु दहा ते बारा वर्षे रोज १२ तास अध्ययन करून श्रीनिधी धायगुडे याचे घनपाठ पारायण पूर्ण झाले.
श्रीनिधी धायगुडे म्हणाला, आज जे प्राप्त झाले आहे, हे भगवंतानेच सहजरित्या माझ्याकडून करून घेतले आहे. वेदांच्या नित्य पठणाला याचे श्रेय जाते. यापुढेही वेदांची नित्यसेवा माझ्याकडून घडेल. वेदांचा प्रसार माझ्याकडून करण्याचा प्रयत्न करेल, असेही त्याने सांगितले.
उदय भागवत म्हणाले, घनपाठाची परीक्षा ही अत्यंत अवघड असते ती कोणालाही सहजासहजी शक्य होत नाही सध्याच्या काळात घनपाठी तयार होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जे पारायण करत आहेत त्यांना प्रोत्साहन देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. अन्यथा या कला लुप्त होतील.
श्रीनिधि याच्या घराण्यात वेदविद्या व शास्त्रविद्या शिकण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्याचे अध्ययन अगदी बाल्यावस्थेत सुरू झाले. स्तोत्र वाङ्मयाचे पाठांतर झाल्यानंतर आईने श्रीमद्भगवद्गीता मुखोद्गत करून घेतली.
दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम शृंगेरी येथे १००८ जगद्गुरु श्री भारतीतीर्थमहास्वामीचे समीप संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता १८ अध्याय परीक्षा देऊन उद्यम श्रेणी प्राप्त केली. अष्टमेवर्षे मौजीबंधन करून वेदाध्ययनास सुरुवात झाली. बाल्यकालापासूनच अनेक मान्यवर संस्थांमध्ये म्हणजे श्री कामकोटी पीठम् कांचीपुरम्, श्री दत्त पीठम् मैसूर, वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे, श्री सहस्रबुद्धे समाधि मंदीर पुणे, अशा अनेक ठिकाणी संहिता, ऐतरेय ब्राह्मण, आरण्यक उपनिषद् (शाखा) परीक्षा देऊन उत्तम श्रेणीत उत्तीर्णता प्राप्त केली.