कोथरुड मधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील धावून गेले असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लोकसहभागातून पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
नुकत्याच पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या नदी काठच्या भागात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. कोथरुड मधील एरंडवणा भागातील रजपूत वीटभट्टी आणि खिल्लारे वाडी परिसरात ही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. मात्र, नामदार चंद्रकांतदादा पाटील वेळीच धावून गेल्याने या भागातील नागरिकांना मोठा आधार मिळाला होता. नामदार पाटील यांनी पहिल्या दिवसापासून मदत कार्य सुरु करुन इथल्या नागरिकांची सर्व प्रकारे काळजी घेतली. पूर ओसरल्यानंतर भागांच्या स्वच्छतेसह नागरिकांना कपडे, किराणा सामान आणि संसारोपयोगी वस्तू उपलब्ध करून दिल्याने इथल्या नागरिकांची मोठी गैरसोय टळली.
दुसरीकडे मुलांच्या शाळा काही महिन्यांपूर्वीच सुरू झाल्याने पालकांनी आपल्या पाल्यांसाठी मोठ्या कष्टाने आणलेले शालेय साहित्य पाण्यात वाहून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, चंद्रकांतदादा पाटील यांनी या भागातील मुलांना तातडीने पाठ्यपुस्तकांसह शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याने मोठा दिलासा मिळाला. आज नवीन साहित्य मिळाल्याने अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या वाटपावेळी भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सरचिटणीस अनुराधा एडके, राज तांबोळी, प्रभाग अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, शिवाजी शेळके, गायत्री लांडे, कुणाल तोंडे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.