पिंपरी, – क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील (भीमसृष्टी) मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. ११ ते १५ एप्रिल २०२५ या कालावधीत विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. या प्रबोधन पर्वात महानाट्य, लाईव्ह कॉन्सर्ट, गीतगायन, पोवाडे, कव्वाली, एकपात्री नाट्यप्रयोग, चर्चासत्रे, परिसंवाद, शाहिरी जलसा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधन पर्वात सहभागी होऊन कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
याशिवाय, या प्रबोधन पर्वास सहकार नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रबोधन पर्वाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार अरूण लाड, उमा खापरे, जयंत आसगावकर, योगेश टिळेकर, अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, भीमराव तापकीर, विजय शिवतारे, महेश लांडगे, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, सुनिल कांबळे, चेतन तुपे, शरद सोनवणे, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल शेळके, बाबाजी काळे, हेमंत रासणे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे यांची सन्माननीय उपस्थिती यावेळी असणार आहे. या मान्यवरांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दि.११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता मी जोतीबाची सावित्री या प्रज्ञा गवळी यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगाने प्रबोधनपर्वास सुरूवात होणार आहे. त्यानंतर ११ वाजतासमता कला मंच प्रस्तुत विद्रोही शाहिरी जलसा हा कार्यक्रम सादर होणार आहे. यानंतर सागर येल्लाळे, सुनिल गायकवाड, मारूती जकाते, वैशाली नगराळे, भारत लोणारे हे गीतगायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारी २ वाजता गायक राहुल कांबळे, सुरज आतिश यांचा समाज प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर थिएटर वर्कशॉप कंपनी प्रस्तुत गुलामांच्या उतरंडी या नाटकाचे आयोजन करण्यात आले असून प्रभाकर पवार या नाटकाचे सादरकर्ते आहेत. सायंकाळी ५ वाजता क्रांतिसुर्य ते महासुर्य – समतेच्या क्रांतीलढ्याचा प्रवास या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, संदीप कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, विचारवंत मिलिंद टिपणीस आणि साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ सहभागी होणार आहेत. यानंतर ७ वाजता जॉली मोरेमा आणि सिमा पाटील भारतीय संविधानाची गौरवगाथा – वुई द पिपल हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रात्री ८.३० वाजता ब्लू मून एंटरटेनमेंट प्रस्तूत क्रांतीसूर्य या नाटकाने पहिल्या दिवसाची सांगता होणार आहे. राजपाल वंजारी या नाटकाचे निर्माते तर विजय गायकवाड लेखक व दिग्दर्शक आहेत.
शनिवार १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता परिवर्तन कला महासंघाच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गायक लुकमान शाह आणि महेंद्र सावंग गीतगायन सादर करणार आहेत. दुपारी १ वाजता गझल गायक अशोक गायकवाड, संगीत विशारद निलेश कसबे आणि प्रशांत पवार यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता भारताच्या संविधानावर आधारित भारत का संविधान या गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध गायक कुणाल वराळे यामध्ये सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता सर्वव्यापी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) ऍड. गोरक्ष लोखंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे प्र. कुलगुरू डॉ. वाल्मिकी सरवदे, प्रसिद्ध विधीज्ञ ऍड. अंबादास बनसोडे आणि राष्ट्रीय जल अकादमीचे संचालक मिलिंद पानपाटील हे सहभागी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध सिनेपार्श्वगायक आनंद प्रल्हाद शिंदे यांचा महामानवांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे.
रविवार दि. १३ एप्रिल रोजी सुप्रसिद्ध गायिका सपना खरात आणि भगवान शिरसाठ यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाने तिसऱ्या दिवसाची सुरूवात होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक वैभव खुने, भाग्यश्री इंगळे, कुमारी नालंदा सांगवीकर यांच्या बुद्ध भीमगीतांची परिवर्तनवादी मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता मेघानंद जाधव आणि अमोल जाधव यांचा शाहिरी जलसा हा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता गायक धिरज वानखेडे, स्वप्निल पवार, अनिल गायकवाड, रोमिओ कांबळे यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता प्रसिद्ध गायक आनंद किर्तने गीतगायनाचा कार्यक्रम सादर करणार असून त्यानंतर ज्येष्ठ गायिका सुषमादेवी, मैना कोकाटे, साधना मेश्राम यांचा गीतगायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सायंकाळी ७ वाजता मेरा भीम जबरदस्त है या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ख्यातनाम गुजराती गायक विशन काथड गीतगायन सादर करणार आहेत. रात्री ८.३० वाजता प्रबोधनात्मक गीतगायनाच्या कार्यक्रमाने तिसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे. यामध्ये सिनेपार्श्वगायिका साधना सरगम, ख्यातनाक गायक चंद्रकांत शिंदे, सिनेपार्श्वगायक रेश्मा सोनवणे, सूर नवा ध्यास नवा फेम रवींद्र खोमणे व इतर कलाकार सहभागी होणार आहेत.
सोमवार १४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता बुद्ध भीम गीतांचा अंतर्भाव असलेली शास्त्रीय गायनाची मैफिल – धम्मपहाट या कार्यक्रमाने दिवसाची सुरूवात होणार आहे. ख्यातनाम शास्त्रीय गायक डॉ. मधुकर मेश्राम आणि सहकारी यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी ८ वाजता आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार कबीर नाईकनवरे यांचा भारताच्या संविधानावर आधारित भारत का संविधान हा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सकाळी ९.३० वाजता भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महामानवास वंदना व समता सैनिक दलाची मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर १० वाजता एकता कर्मचारी महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर दिया बनसोडे आणि त्यांचे सहकारी समुह नृत्याविष्कार – फ्लॅश मॉब हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सकाळी १०.३० वाजता आदिवासी कलानृत्यातून महामानवांना अभिवादन करण्यात येणार असून ११ वाजता फ्रेण्ड्स ग्रुप ऑफ सिद्धार्थ यांच्या वतीने भिमस्पंदन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर गायिका मंजुषा शिंदे व ज्येष्ठ गायिका चंद्रभागा गायकवाड गीत गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारी २ वाजता गायक अजय देहाडे यांचा तुफानातले दिवे हा गीतगायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रख्यात गायक विष्णु शिंदे आणि प्रसिद्ध खंजिरी वादक मिरा उमप यांचा गीतगायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर ७.३० वाजता राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. पाशा यांच्या दिव्यांग कलाकारांचा सहभाग असलेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा नृत्य संगीतमय विश्वातील अविस्मरणीय कलाविष्कार ट्रिब्यूट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स या नृत्य संगीतमय अविष्कार असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चौथ्या दिवसाचा शेवट ९.३० वाजता महासंगीताचा आंबेडकरी जलसा – तुझ्या पाऊल खुणा भीमराया या कार्यक्रमाने होणार आहे.
मंगळवार १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता स्थानिक कलावंत गीतगायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यानंतर सानिका संजय जाधव यांच्या मी रमाई बोलते या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता स्थानिक कलावंतांच्या गीतगायनाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ४ वाजता भीमबुद्ध गीतांची गोड वाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यामध्ये मोहम्मद रफी शेख, सुमेध कल्हाळीकर, निशांत गायकवाड, अनिरूद्ध सुर्यवंशी, अमिर शेख हे गायक सहभागी होणार आहेत. त्यानंतर संकल्प गोळे, अनिल गायकवाड, विशाल ओव्हाळ, मुन्ना भालेराव या कलाकारांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता निमंत्रितांद्वारे चळवळीच्या कवितांचे अभिवाचन होणार असून रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध गायिका संगीत विशारद प्रज्ञा इंगळे यांच्या गीतगायनाने पाचव्या दिवसाची सांगता होणार आहे.
बुधवार १६ एप्रिल सायंकाळी ५ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आणि भारताच्या संविधान निर्मितीवर आधारित, प्रकाश आणि ध्वनीचा सुरेख संगम असणारे, मा संजय जीवने दिग्दर्शित आणि द बोधिसत्व फाऊंडेशन, नागपूर प्रस्तुत “संविधान शिल्पकार” या महानाट्याचे आयोजन सांगवी येथील पी. डब्लू. डी. मैदान येथे करण्यात आले आहे. या महानाटकामध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा, गीत, नृत्य आणि ढोल-ताशा पथकावर रॅप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत युगनायक फेम सुप्रसिद्ध अभिनेते अथर्व कर्वे, माता रमाई यांच्या भूमिकेत अनेक पारितोषिक प्राप्त नाट्य व सिने अभिनेत्री सांची जीवने यांच्यासह अनेक सिने आणि नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्गज कलाकारांचा सहभाग असणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवावी आणि महापुरूषांच्या कार्याचा जागर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.