पुणे- जेव्हा परिवार, समाज आणि देश महिलांचा सन्मान करायला शिकेल तेव्हा त्यांच्यावर न्यायालयात जाण्याची वेळ येणार नाही आणि खऱ्या अर्थाने महिलांचे सशक्तिकरण होईल असे मत राजनीतिज्ञ माधवी लता यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचे वतीने ‘कायद्याच्या माध्यमातून महिला सशक्तिकरण’ या विषयावर लता यांचे अतिथी व्याख्यान आयोजित केले होते. डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ऍड, अशोक पलांडे, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, प्राचार्य डॉ सुनिता यांची प्रमुख उपस्थिती होती.
लता म्हणाल्या, “विभक्त कुटुंबात मुलांकडे पाहणारे कोणी नसते. त्यासाठी घरात आजी आजोबांची गरज असून एकत्र कुटुंब व्यवस्था निर्माण केली पाहिजे. युवा पिढीने त्यासाठी काम करण्याची गरज आहे. कारण युवकांचा स्वभाव लवचिक असतो आणि समजही चांगली असते. महिलांना आदर, सन्मान, मान्यता आणि प्रेम देण्याचे संस्कार एकत्र कुटुंबातून होऊ शकतील. ज्यामुळे त्यांच्यावर न्यायालयात दाद मागण्याची वेळच येणार नाही.”
लता पुढे म्हणाल्या “मुलांना महिलांच्या समस्या सांगितल्या जातात. त्या ऐवजी त्यांच्या क्षमतांचा परिचय करून दिला पाहिजे. कुटुंबातील महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. कुटुंबात तंत्रज्ञान आणल्यास नातेसंबंध दुरावण्याची शक्यता असते. मानवी जीवन स्वयंकेंद्रित झाले आहे. महिलांनी न्यायालयात जाऊ नये म्हणून पाश्चात्त्य पद्धतीने विचार करणे अयोग्य राहील. त्यासाठी भारतीय पद्धतीने मुळापासून समस्येचे निवारण करण्याची गरज आहे.
प्रा आराधना कांबळे यांनी सूत्रसंचालन व परिचय करून दिला. प्राचार्य आढाव यांनी प्रास्ताविक केले रावत यांनी स्वागत केले.