मुंबई -आजपासून गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर 30 रूपयांनी स्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळला आहे. आता 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 30 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज (1 जुलै) सकाळी बीपीसीएल आणि एचपीसीएल गॅस सिलिंडरचे दर मी करण्याची घोषणा केली आहे. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली असली तर घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
व्यावसायिक गॅस सिलिंडर 30 रूपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतल्यानंतर आता दिल्लीत 19 किलोचा गॅस सिलिंडर 1,646 रुपयांना मिळणार आहे. आधी तोच गॅस सिलिंडर 1,676 रुपयांना मिळत होता. तसेच मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,629 रुपये होती. आता 1,598 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये 1,756 रुपयांना आता गॅस सिलिंडर मिळणार आहे. आधी त्याची किंमत 1787 रुपये होती. तसेच चेन्नईमध्ये 1,809 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती स्वस्त करण्यात आल्या असल्या तरी घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. सध्या घरगुती स्वयंपाकाचे सिलिंडर दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, तर मुंबईत 802 रुपये, चेन्नईमध्ये 818 रुपयांना आहेत.
दरम्यान, सर्वसामान्यांसाठी खर्चाचे नियोजन करण्यासाठी पगाराची 1 तारीख महत्त्वाची असते. या 1 तारखेला दर महिन्यात काही गोष्टी स्वस्त होतात तर काही गोष्टी महाग होतात. आता या 1 जुलैला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 30 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.