पुणे: ‘महावितरणचा धर्म हा ‘प्रकाश’ पेरण्याचा आहे. या धर्माला जागून महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार गेल्या ३६ वर्षांपासून अत्यंत सचोटीने, ध्येयाने व मातीशी इमान राखून लोककल्याणाचे, ग्राहकसेवा देण्याचे काम करीत आहे. आपल्या कर्तबगारीने सामान्यांतून एक नायक झालेले श्री. राजेंद्र पवार यांचे जीवनचरित्र हे समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.ग्रीन वर्ल्ड प्रकाशन व ज्ञान फौंडेशनच्या वतीने येथील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात गौतम कोतवाल लिखित ‘राजेंद्र पवार- एक प्रकाशझोत’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, पंकज गावडे महाराज, महाराष्ट्र आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर, गौतम कोतवाल, मनोहर कोलते, डॉ. विठ्ठल सोनवणे यांची उपस्थिती होती. यावेळी ज्ञान फौंडेशनच्या वतीने राजेंद्र पवार यांना ‘ग्राहकसेवा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मनोहर कोलते लिखित ‘मनोहारी विचार भाग २’ व डॉ. विठ्ठल सोनवणे लिखित ‘वसंत वर्षा’ त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, विजेची सोय नसलेल्या तेव्हाच्या जव्हार तालुक्यात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या राजेंद्र पवार यांनी इयत्ता दहावीमध्ये प्रथमच विजेचा बल्ब पाहिला. या बल्बच्या प्रकाशाचे आकर्षण म्हणून ते विद्युत क्षेत्रात आले आणि दुर्गम, अतिदुर्गम ग्रामीण भागात, दऱ्याडोंगरातील लाखो घरांमध्ये वीजजोडण्यांच्या माध्यमातून घरे, परिसर उजळून काढले आहेत. हे करीत असताना ‘प्रकाशा’चा रंग जसा पांढरा शुभ्र आहे तोच रंग श्री. पवार यांनी चारित्र्यासाठी जपला आहे. सरकारी संस्थेमध्ये अधिकारी म्हणून काम करताना सामाजिक जाणीव असल्यास लोकसेवा अत्यंत परिणामकारकतेने व प्रभावाने करता येते याचा प्रत्यय राजेंद्र पवार यांनी दिला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गात बसण्यापेक्षा निश्चयाने, ध्येयाने संकटांवर मात करण्यासाठी इच्छाशक्ती जागवणारे हे पुस्तक आहे. ते प्रत्येकाने वाचले पाहिजे. सरकारी सेवेत असणारे एक असामान्य कर्तृत्व शब्दांनी रेखाटण्याचे व समाजाला प्रेरणा देण्याचे काम लेखक गौतम कोतवाल यांनी केले आहे.
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, की दहावीमध्ये प्रथमच पाहिलेला एका बल्बचा ‘प्रकाश’ मला हजारो घरांमध्ये उजेड पेरण्याची ऊर्जा देऊन गेला. मी कोणत्याही पदावर असलो तरी सहकाऱ्यांमध्ये वेगळा नाही. त्यामुळे जनमित्र, अभियंते यांच्यासह सर्वांची साथ मला लाभली. त्यांच्या साथीने चक्रीवादळे, महापूरांमध्ये नेस्तनाबूत झालेली वीजयंत्रणा विक्रमी वेळत उभारण्याची कामगिरी करता आली. नाशिक व पुणे जिल्ह्यातील दऱ्याखोऱ्यांत वीजयंत्रणा उभारून घरांमध्ये वीजजोडण्या देता आल्या. जिथे अंधार आहे ते घर, परिसर प्रकाशमान करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. महावितरणच्या माध्यमातून यापुढेही सामाजिक जाणिवेने ग्राहकसेवेचे काम करीत राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्री. पंकज गावडे महाराज म्हणाले, की आत्मा म्हणजे ऊर्जाच आहे. ही ऊर्जा सकारात्मक असली की एकमेकांच्या जीवनात आनंद पेरताना अलौकीक समाधान मिळते. माणूस जगातून गेल्यानंतर त्याच्या भौतिक संपत्तीपेक्षा तो कर्तृत्वाने अधिक समाजमनात उरला पाहिजे. अशीच माणसे समाजाचे आदर्श होतात. त्याप्रमाणे राजेंद्र पवार यांचे कर्तृत्व हे समाजाभिमुख राहून लोकसेवा देणारे एक आदर्शवत आहे.
श्री. सचिन इटकर यांनी सांगितले, की ज्यांना समाजाची वेदना कळते आणि कुठे आलो, त्यापेक्षा कुठून आलो ही जाणीव सतत राहते त्याच व्यक्ती समाजहित व लोकसेवेसाठी सदैव जागरूक व सज्ज असतात. समाजवेदना जाणणारे राजेंद्र पवार यांच्या जीवनचरित्रावरील हे पुस्तक निश्चितच सर्वांसाठी प्रेरणा व ऊर्जा देणारे आहे.
ग्रीन वर्ल्ड प्रकाशनचे संचालक व लेखक श्री. गौतम कोतवाल म्हणाले, दोन वर्षांपूर्वी एका पुस्तकासाठी मुलाखत घेताना श्री. राजेंद्र पवार यांच्या जीवन प्रवासाची थोडक्यात माहिती झाली. खडतर परिस्थितीशी विनातक्रार संघर्ष करीत कर्तृत्ववान झालेले आणि मातीशी प्रामाणिक राहून सरकारी सेवा म्हणजे एक सामाजिक बांधिलकी मानणारे श्री. राजेंद्र पवार यांचे जीवनचरित्र समाजासाठी प्रेरणादायी आहे व ते लोकांपर्यंत गेले पाहिजे या ध्यासाने ते लिहण्याची इच्छा होती. त्यासाठी श्री. पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करावा लागला व आज हे पुस्तक प्रकाशित झाल्याचे समाधान मिळाले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञान फौंडेशनचे अध्यक्ष श्री. मनोहर कोलते यांनी केले तर श्री. भागवत थेटे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला सौ. उज्ज्वला पवार, सेवानिवृत्त तांत्रिक संचालक भय्यासाहेब देशमुख, सेवानिवृत्त मुख्य अभियंता रामराव मुंडे, वामनराव जगताप, प्रल्हाद साळुंखे, पंडित वसंत गाडगीळ, विजय कोलते, महेंद्र दिवाकर, सुनील जगताप, युवराज जरग, अरविंद बुलबुले, संजीव नेहते, अमित कुलकर्णी आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.