पुणे : टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी…. ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार – आरफळकर, ह.भ.प राणा महाराज वासकर, ह.भ.प संग्राम बापू भंडारे महाराज आदी उपस्थित होते.
मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात वारकरी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपयांचे अर्थसाह्य आदी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल वारकरी संत महंत पाईक संघटना मधील प्रमुख महाराज यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत संवाद साधला. वारकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये लाभ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल येथील महिलाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
*वारकऱ्यांसाठी शासनातर्फे सुविधा
आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदीर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे.
तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, नगर परिषदचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी संस्थानचे पदाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटनही करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने वारकऱ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया निःशुल्क असून गेल्या २ वर्षात २७५ कोटींची वैद्यकीय मदत गरजूंना देण्यात आली आहे. त्यामुळे ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचले आहेत.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कोणत्या आजारांसाठी देण्यात येतो व निधी मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीही यावेळी देण्यात आली.