सोलापूर : अतिशय लोकप्रिय आणि उच्च साहित्य दर्जाच्या नाट्य वाचनातून नाटककार जयवंत दळवींच्या नाट्य लिखाणातील भावविश्व उलगडले. निमित्त होते मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगसंवाद प्रतिष्ठानतर्फे हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित ‘नाटककार दळवी समजून घेताना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे.

मराठीतील प्रथितयश लेखक, नाटककार जयवंत दळवी यांच्या लेखनाचा संपूर्ण महाराष्ट्रसह देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. नाटककार जयंत दळवी यांच्या लेखनाची शैली आणि वैशिष्ट्ये वेगवेगळ्या अंगांनी सोलापूरकरांना कळावीत याकरिता रंगसंवाद प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रसिकांच्या उदंड प्रतिसादात झालेल्या या कार्यक्रमाने सोलापूरकरांना बुधवारी आगळीवेगळी साहित्य मेजवानी मिळाली.

प्रारंभी आद्य नाट्यकर्मी विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे आणि नटराजाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. तसेच डॉ. नसीमा पठाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. नसीमा पठाण, शरदकुमार एकबोटे, प्रशांत बडवे, विजय साळुंखे, सुहास मार्डीकर, आकाशवाणीचे अधिकारी डॉ. सोमेश्वर पाटील, अर्चिता ढेरे, रंगसंवाद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. मीरा शेंडगे उपस्थित होते.

अपूर्वा शहाणे आणि कनिष्का शिवपुजे यांनी सादर केलेल्या ‘पंचतुंड नररुंड माळधर’ या नांदीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रत्येक नाट्यसंहिता वाचनाच्यापूर्वी मंजुषा गाडगीळ यांनी त्या नाटकाच्या माहितीचे सूत्रनिवेदन आणि दृकश्राव्य सादरीकरण केले. नाटककार जयवंत दळवी यांच्या संध्याछाया, बॅरिस्टर, सावित्री, पुरुष आणि लग्न या पाच नाटकांच्या संहितांचे वाचन कलाकारांनी केले. त्यांना उपस्थित रसिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता संकलन आणि दिग्दर्शन रंगसंवाद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. मीरा शेंडगे यांचे होते. तर विविध संहितांचे अभिवाचन सुहास मार्डीकर, मनोज परांजपे, अभिज भानप, श्रीधर खेडगीकर, प्रथमेश कासार, श्रीकृष्ण जोशी, मास्टर सुजल, मास्टर श्रिया, कल्पना जोशी, वंदना प्रभू, मिहिका शेंडगे, अश्विनी वाघमोडे, सावनी देशपांडे, सायली माने, कनिष्का शिवपुजे, अपूर्वा शहाणे यांनी केले. तसेच प्रकाश योजना उमेश बटाणे, ऍड. मळसिद्ध देशमुख, सचिन कासेगावकर, संगीत मिहिका शेंडगे तर सूत्रनिवेदन मंजुषा गाडगीळ यांचे होते.


