पिंपरी-चिंचवड- प्रभू श्रीराम अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, समस्त हिंदूंचा स्वाभिमान आहेत. येत्या 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमीचा उत्सव असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने आणि दिमाखदार स्वरूपात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी शोभायात्रा भोसरी, पिंपरी-चिंचवडमध्ये PCMCआयोजित केली जाते. यावर्षी ‘‘महाबली हनुमान’’ यात्रेचे प्रमुख आकर्षण आहेत.
भाजपा नेते तथा आ. महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृपासाई फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य रामनवमी महोत्सव रामरथ सोहळा- 2025 येत्या रविवारी, दि. 6 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शोभा यात्रेचे आयोजन केले असून, त्या निमित्ताने भोसरीमध्ये प्रथमच महाबली हनुमानांच्या तब्बल 25 फुटी भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

रामनवमी निमित्त सायंकाळी चार वाजता शोभा यात्रेला सुरुवात होणार आहे. श्री राम मंदिर, चक्रपाणी वसाहत भोसरी, पी.एम.टी. चौक विनायक रेसिडेन्सी , विरंगुळा केंद्र दिघी रोड या मार्गाने शोभायात्रा मार्गस्थ होईल.
भव्य मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी…
भोसरी येथील पीएमटी चौक येथे 4 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता तब्बल 25 फूट उंचीच्या महाबली हनुमान यांच्या मूर्तीचे अनावरण मोठ्या दिमाखात करण्यात आले. ही हनुमान मूर्ती अमरावती येथील शिल्पकार शिवा प्रजापती यांनी अत्यंत सुबकपणे साकारली असून, कृपासाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ज्ञानदेव पवार यांच्या संकल्पनेतून ही मूर्ती साकार झाली आहे. सदर मूर्ती पाहण्यासाठी रामभक्त आणि भाविकांची गर्दी होत आहे.
***
शोभायात्रेचे विशेष आकर्षण
शोभायात्रेमध्ये 25 फूट महाबली हनुमान मूर्ती, प्रभू श्रीरामांची 15 फूट उंच मूर्ती, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळांचे सादरीकरण, बँड पथक, साउंड सिस्टीम, आकर्षक विद्युत रोषणाई, लेझर शो, स्क्रीन शो आकर्षण असणार आहे.
****
प्रभू श्रीराम नवमीचा उत्सव दरवर्षी दिमाखात आपण साजरा करतो. प्रभू श्रीरामांची भक्ती, हिंदू संस्कृतीचा अभिमान आणि ऐक्य भावी पिढी समोर ठेवण्याचे कार्य आम्ही आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतले आहे. रामनामाचा गजर आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या शोभायात्रेत सर्वांनी सहभागी होऊन या अभूतपूर्व अशा सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करतो.
– प्रदीप पवार, अध्यक्ष, कृपासाई फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड, पुणे.