पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरामध्ये ६ लाखाहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत. नोंदणीकृत मालमत्तांना मालमत्ताकराचे बिल वेळेमध्ये पोहोचवण्यासाठी करसंकलन विभागाकडून ‘प्रकल्प सिध्दी’उपक्रम राबविण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शहरातील महिला बचत गटांच्या महिलांना शहरामध्ये मालमत्ताकराचे बिल वाटप करण्यासाठी नेमण्यात आले. प्रकल्प सिध्दी उपक्रमाच्या माध्यमातून करसंकलन विभागाने निर्माण केलेल्या मोबाईल अँप्लिकेशनच्या माध्यमातून मालमत्ताधारकांची माहिती अपडेट करण्यात आली. त्यासोबत, मालमत्तांचे अक्षांश-रेखांश, बिल वाटप केल्याची वेळ, बिल वाटप करतानाचा फोटो आदी माहितीचे संकलन करण्यात आले. चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यामध्येच ऑनलाईन स्वरुपामध्ये मालमत्ता कराची बिले उपलब्ध करण्यात आली. त्याबरोबरच, करसंकलन विभागाने नागरिकांना सवलतींचा लाभ मिळावा यासाठी बिलाच्या वितरण प्रक्रियेमध्ये सुधारणा करुन बिल वाटपाची प्रक्रियेमध्ये गतिशीलता निर्माण होण्यासाठी पुढाकार घेतला. चालू आर्थिक वर्षामध्ये ५,३२,९९९ मालमत्तांना प्रकल्प सिध्दी उपक्रमाच्या माध्यमातून बिलांचे वितरण करण्यात आले. बिल वितरित केल्यानंतर ज्या मालमत्तांच्या दारावर बिल अटकविण्यात आले व ज्या मालमत्ताधारकांकडे बिल सुपुर्द करण्यात आले अशा सर्वांचे छायाचित्र सुध्दा अँप्लिकेशनद्वारे संकलित करण्यात आले. त्यामुळे करसंकलन विभागाकडे ज्यांना बिल बजाविण्यात आले आहे अशांची इत्यंभूत माहिती असून ज्या नागरिकांना बिल मिळाले नाही अशा नागरिकांनी आपले बिल ऑनलाईन स्वरुपामध्ये महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावे. त्यासोबतच, संबंधित करसंकलन विभागीय कार्यालयामध्ये किंवा सारथी हेल्प लाईन क्रमांक ८८८८००६६६६ या क्रमांकावर संपर्क करुन आपल्या बिल वितरित करण्यात आले आहे का याची खात्री करावी. असे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात आले आहे.
सध्या ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही मालमत्ताकराचा भरणा केला नाही अशा नागरिकांना करसंकलन विभाग एसएमएस, टेलीकॉलिंग यामाध्यमातून कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी लवकरात लवकर कराचा भरणा करुन विभागाकडून करण्यात येणारी कारवाई टाळावी यासाठी नागरिकांना विविध प्रकारे आवाहन करण्यात येत आहे.
कोट –
“पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने शहरातील मालमत्ताधारकांपर्यंत वेळेमध्ये बिलांचे वाटप व्हावे यासाठी व बिलावरील माहितीमध्ये सुधारण्यासाठी प्रकल्प सिध्दी उपक्रम राबविला. यामाध्यमातून मालमत्तेच्या माहितीमध्ये दुरुस्त्या करण्यात येऊन ती अद्ययावत करण्यात आली. त्यामुळे आता मालमत्ताधारकांना मालमत्ता कराबाबत एसएमएस द्वारे माहिती पोहोचत आहे. महानगरपालिकेच्या प्रकल्प सिध्दी उपक्रमाने करसंकलन विभागामध्ये विधायक बदल घडवून आणला असून करसंकलनामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आलेला आहे. ज्या नागरिकांना अद्याप बिल मिळाले नसेल अशा नागरिकांनी ऑनलाईन स्वरुपात बिल उपलब्ध करुन अथवा करसंकलन विभागामध्ये संपर्क साधून आपले बिल उपलब्ध करुन कराचा भरणा करावा.”
- प्रदीप जाभंळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
कोट –
“ज्या मालमत्ताधारकांना अद्याप बिल मिळाले नसेल अथवा बिल वितरित करतेवेळी बिल स्विकारण्यास अनुपस्थिती असेल अशा मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन मालमत्ता क्रमांकाद्वारे आपले बिल उपलब्ध करावे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन बिल उपलब्ध करणे सुलभ व सुरक्षित असून तात्काळ आपल्या कराचा भरणा करावा. नागरिकांना मालमत्ताकर भरण्याचे येणारे एसएमएस नागरिकांना जागरुक करण्यासाठी असून ज्या नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा केला आहे तरी त्यांना एसएमएस येत असतील तर अशा तांत्रिक बाबींवर विभाग तातडीने दुरुस्ती करणार आहे. नागरिकांना वेळेमध्ये बिल देण्यासाठी करसंकलन विभागाने आवश्यक प्रयत्न केले असून अद्यापही बिल मिळाले नसेल अशा मालमत्ताधारकांनी सारथी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा अथवा संबंधित विभागीय कार्यालयामध्ये संपर्क करावा.”
- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका