पुणे, पुणेकरांना मिळकत कराची चाळीस टक्के सवलत हवी का नकाे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने सदर सवलतीसाठी घराेघरी जाऊन ‘पीटी ३’ अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली असली तरी, पंचवीस दिवसांत केवळ ४५ हजार मिळकतदारांनीच अर्ज दाखल केले आहे. अद्याप चार लाखाहून अधिक मिळकतदारांकडून अर्ज दाखल करणे बाकी असुन, ३१ जुलैपर्यंत हे काम पुर्ण करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर साेपविण्यात आली आहे.
निवासी मिळकतीचा वापर स्वत: मिळकतदार करीत असेल तर मिळकत करात ४० टक्के सवलत दिली जाते. राज्य सरकारने ही सवलत रद्द केली हाेती, परंतु कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीनंतर राज्य सरकारने मिळकत करातील चाळीस टक्के ही सवलत पुन्हा पुणेकरांना दिली. यानंतर या सवलतीच्या संदर्भात गाेंधळ निर्माण झाला आहे. काही मिळकतदारांना दंडासह वाढीव रक्कमेची बिले आली, तसेच मिळकत करातील ही सवलत आधी मिळत हाेती, ती सध्या मिळत नाही, अशा अनेक तक्रारी मिळकतदारांकडून केल्या जात हाेत्या. या पार्श्वभुमीवर महापािलका प्रशासनाने सवलत हवी असणाऱ्यांकरीता ‘पीटी३’ अर्ज दाखल करण्याचे आवाहन महापािलका प्रशासनाने मिळकतदारांना केले हाेते. हा अर्ज काेणी दाखल करावा असा संभ्रमही निर्माण झालेला आहे.
या सर्व पार्श्वभुमीवर महापािलका प्रशासनाने नुकतेच सिंहगड राेड क्षेत्रीय कार्यालयात एक पायलट प्राेजेक्ट राबविला हाेता. महापालिकेची यंत्रणा वापरून या पायलट प्राेजेक्टमध्ये सर्वे केला गेला. यामध्ये 3709 मिळकतीमध्ये मालक स्वतः राहत असताना त्यांची कर सवलत काढली गेल्याचे आढळून आले. 2294 मिळकतीमध्ये भाडेकरू आढळून आले हाेते. ही बाब लक्षात घेऊन महापािलका प्रशासनाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात हे अर्ज भरून घेण्याची माेहीम राबविण्यास सुरुवात केली. तसेच महापालिकेचे कर्मचारी घराेघरी जाऊन हा अर्ज भरून घेण्यावर भर िदला जात आहे. परंतु, मिळकतदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची माहीती क्षेत्रीय कार्यालयाकडून शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत पुढे आली आहे.
यासंदर्भात मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘‘ गेल्या महीन्यात १९ तारखेपासून ‘पीटी३’ अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली. परंतु आमच्या विभागाला मनुष्यबळ कमी पडत आहे, तसेच मिळकतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. गृहप्रकल्प साेसायटींमध्ये महापािलकेच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही, मिळकतदारांकडून याेग्य प्रतिसाद मिळत नाही अशा अडचणी समाेर आल्या आहेत. यातून मार्ग निश्चितच काढला जाईल. साधारणपणे साडेचार लाख मिळकतदारांकडून हा अर्ज भरून घेणे गरजेचे आहे. ४५ हजार अर्ज आत्तापर्यंत दाखल झाले आहेत. २० जुलै पर्यंत सव्वा दाेन लाख मिळकतदारांकडून व ३१ जुलैपर्यंत सर्वच मिळकतदारांकडून अर्ज भरून घेण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.