पुणे : शूरवीरांचा सन्मान नौबतीसह करायचा ही मराठी परंपरा आहे. त्यानुसार विजयादशमीला भारतीय सैन्यदलातील सेनाधिका-यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सनई-चौघडयाच्या गजरात, रांगोळी व दारावर तोरण लावून मराठमोळ्या पद्धतीने पुण्यात सन्मान करण्यात आला. सेनाधिकारी एअर मार्शल सुनील सोमण (निवृत्त) या वायुदलातील निवृत्त सेनाधिका-यांचा गौरव सैनिक मित्र परिवारातर्फे करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एनआयबीएम कोंढवा येथील सोमण यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोमण यांच्या पत्नी रश्मी सोमण, ज्येष्ठ बँकिंग तज्ञ अॅड.सुभाष मोहिते, किरण पाटोळे, आनंद सराफ, शिरीष मोहिते, विष्णू ठाकूर, नितीन पंडित आदी उपस्थित होते. पुणेरी पगडी, तिरंगी उपरणे, सन्मानचिन्ह, श्रीफळ, मिठाई असे सन्मानाचे स्वरुप होते. कल्याणी सराफ, स्वाती ओतारी, प्रज्ञा काळे त्यांनी आयोजनात सहभाग घेतला.
सुनील सोमण म्हणाले, सैन्यदलात सेवेत असताना माझ्या २३ ठिकाणी बदल्या झाल्या. सकाळी ५.३० ते ६ पासून मी बाहेर जात असे. त्यामुळे मुला-मुलीचे लहानपण पाहिले नाही. अनेकदा आठवडा आठवडा आमचे बोलणे देखील होत नसे. माझ्या पत्नीने कुटुंबाकडे लक्ष देत सर्व काही केले. त्यामुळे मी देश रक्षणार्थ कार्य करु शकलो. भारतीय हवाई दलात मी सन १९७६ पासून कारकीर्दीस सुरुवात केली. युद्ध सहभाग, तातडीच्या मोहिमा, लढाऊ विमान दलाचे नेतृत्व, नवोदितांना प्रशिक्षण, लष्कराच्या विशेष समितीचे सल्लागार, असा प्रदीर्घ कार्य सहभाग देखील घेतला. आता निवृत्तीनंतर सैनिक मित्र परिवारने माझ्या कार्याची दखल घेत केलेला सन्मान माझ्यासाठी खूप वेगळा आहे.
आनंद सराफ म्हणाले, सन १९९६ पासून सैनिकांसाठी कृतज्ञतेने काम करण्याचा प्रयत्न, सैनिक मित्र परिवाराच्या माध्यमातून केला जात आहे. सामान्य नागरिकांनी सैनिकांसाठी काहीतरी करावे, यासाठी ही संकल्पना सुरु झाली. तिरंगी झेंडयासाठी प्राण पणाला लावणा-या सैनिकांच्या प्रत्येक सणाला पहिला मान आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन हे सण साजरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. भारत खळदकर यांनी सनई-चौघडा वादन केले.