पंढरपूर -ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला दिनांक 9 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली होती, या पुजेची सांगता दिनांक 09 जून रोजी करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
श्रीविठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यात येते. श्री विठ्ठलाच्या चंदनउटीपुजेसाठी 21 हजार व रूक्मिणीमातेच्या पुजेसाठी 9 हजार इतके देणगी मुल्य आकारण्यात येते.
श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने दिनांक 15 मार्च ते 01 जून पर्यंत पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे 5.00 ते सकाळी 11.00 पर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत होते. त्यामुळे या कालावधीतील पुजा भाविकांना उपलब्ध करून न देता मंदिर समिती मार्फत करण्यात आल्या होत्या.
दिनांक 02 जून रोजी पदस्पर्शदर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांना चंदनउटी पुजा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये विठ्ठलाकडे 18 व रूक्मिणीमातेकडे 12 भाविकांना पुजेचा लाभ मिळाला असून, यामधून मंदिर समितीला 4 लाख 86 हजार इतके उत्पन्न मिळाले आहे.मंदिर समितीच्या वतीने श्रींची चंदनउटीपूजा करून या पूजेची सांगता करण्यात आली. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे व ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर तसेच विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते. याशिवाय, चंदनउटीपुजेच्या सांगतानिमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे 2000 ते 2200 भाविकांना लाभ घेतला.
चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका