कोल्हापूर : डिसेंबर २०२३ मध्ये केंद शासनाने घेतलेल्या आढाव्यामध्ये देशातील साखरेची उपलब्धता कमी राहण्याचा आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात अवाजवी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आणि त्यानुसार केंद्र शासनाने ७ डिसेंबर २०२३ च्या आदेशाद्वारे उसाचा रस /साखरेचा अर्क तसेच बी हेवी मळी पासून इथेनॉल निर्मितीस तातडीने बंदी आणली . या अकस्मात झालेल्या निर्णयामुळे संपूर्ण साखर उद्योगात खळबळ माजली . कारखान्यांमध्ये तयार असलेले इथेनॉल , इथेनॉलसाठी लागणारे बी हेवी मळीचे साठे तसेच तेल कंपन्यांशी केलेले करार या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले . त्याच सोबत इथेनॉल निर्मितीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाकडून मिळालेले प्रोत्साहन आणि दिलेल्या आश्वासनाच्या विश्वासार्हतेवर देखील साशंकता निर्माण झाली आणि या क्षेत्रात झालेली व होणारी आर्थिक गुंतवणूक धोक्यात येण्यासारखी परिस्थिती उद्भवली.
याबाबत सर्वप्रथम राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने या सर्व बाबी व त्याचे गांभीर्य तातडीने केंद्र शासनाच्या नजरेस आणले आणि त्याच्या फलस्वरूप केंद्राने १५ डिसेंबर २०२३ च्या सुधारित आदेशाद्वारे शिल्लक इथेनॉल आणि काही प्रमाणात बी हेवी मळी याचा इथेनॉल वापरासाठी परवानगी देऊन देशभरातील आसवनी प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांना अंशतः दिलासा दिला मिळाला.