पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्सच्या (आयओडी) पश्चिम विभागीय पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘टेक्नॉलॉजीकल होरायझन्स : शेपिंग कॉर्पोरेट गव्हर्नन्स इन डिजिटल लँडस्केप’ या संकल्पनेवर आधारित हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे ‘आयओडी’ पदाधिकाऱ्यांची परिषद नुकतीच आयोजिली होती. यावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सूर्यदत्त फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला खास स्कार्फ व सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला.
राज्याचे माजी मुख्य सचिव आणि ‘आयओडी’च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनाही प्रमाणपत्र देऊन शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. कुंटे यांच्यासह बजाज फायनान्सचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनुराग चोट्टानी, एमआयटीसीचे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गादिया, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हॅरोल्ड डिकोस्टा, पर्सिस्टंट सिस्टिम्सचे सीआयएसओ देवेंदर कुमार, पूना कपलिंगच्या सहव्यवस्थापकीय संचालिका मेघना मुळ्ये व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
‘इनोव्हेशन व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन : कॉर्पोरेट गव्हर्नन्स, उत्पादन उद्योगांत माहिती तंत्रज्ञानाचा वापर याचे मूल्यांकन’, ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे आधुनिकीकरण : तत्वे आणि पद्धती’, ‘डिजिटलायझेशन अँड इनोव्हेशन : संस्थेच्या भविष्यातील वाढीचा आधार’ अशा तीन विषयांवर या परिषदेमध्ये विचारमंथन झाले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “बदलत्या डिजिटल युगात वाटचाल करताना उद्योगांसाठी नवनवीन शोध, त्याचा स्वीकार आणि प्रशासन संरचनांची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. शाश्वत आणि लवचिक प्रशासनाचा मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्वाची ठरेल. इनोव्हेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या दृष्टीने कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या मूल्यांकनावर परिषदेत भर देण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा कायापालट करण्याची ताकद आहे. मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि ब्लॉकचेन्स यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उदय, उत्पादकता वाढवण्यासाठी, सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी आणि नवीन व्यावसायिक मार्ग उघडण्यासाठी लाभदायी ठरणार आहे.”