पुणे : शत्रूशी दोन हात करीत देशासाठी प्राणांची आहुती देणा-या महिलांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या घटना आपल्या प्रत्येकाला माहित आहेत, असे नाही. भारतीय स्त्रीयांच्या शौर्याबाबत अनेक ब्रिटीश अधिका-यांनी देखील लिहून ठेवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून,देश कार्यात, महिलांचे मोठे योगदान असून आज भारतीय सैनीकांच्या वीरपत्नी घर सांभाळण्याची दुसरी मोठी लढाई करीत आहेत, असे मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
विधायक पुणे, सैनिक मित्र परिवार, रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन, विश्वलीला फाऊंडेशन, सेवा मित्र मंडळ, स्नेहमंच , राष्ट्रीय कला अकादमी, तर्फे देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या आणि सीमेवरुन बेपत्ता झालेल्या २५ सैनिकांच्या वीरपत्नींची भाऊबीज सदाशिव पेठेतील भिकारदास मारुती मंदिराजवळ असलेल्या नारद मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, विष्णू ठाकूर, अभिजीत म्हसकर, संजय बालगुडे, उमेश देशमुख, शेखर कोरडे,आनंद सराफ, रेखा देशपांडे आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा २५ वे वर्ष होते. वयोवृद्ध व आजारी भगिनींना घरपोच भाऊबीज देण्यात आली.
वीरपत्नी दिपाली मोरे म्हणाल्या, देशासाठी प्रत्येक सैनिक लढत असतो. आपल्या कुटुंबाला सोडून सीमेवर अहोरात्र पहारा देत असतो. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवाळीमध्ये आपण एक पणती लावावी. सैनिक मित्र परिवार सारख्या संस्था आम्हाला दिवाळीसारख्या सणात सहभागी करुन घेतात, याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ॠणी आहोत.
आनंद सराफ म्हणाले, वानवडी येथे वीरस्मृती नावाची इमारत आहे. सन १९६२ साली चीन युद्धात बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांसाठी ही इमारत उभारण्यात आली. तेथील वीरपत्नी तसेच इतरही युद्ध व चकमकींमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नींसोबत आम्ही दरवर्षी भाऊबीज साजरी करतो. वेगवेगळे सणवार त्यांच्यासोबत साजरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले.
.