पुणे -आरटीई RTE प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर सोमवारपासून (दि. २२) एसएमएस जाण्यास सरूवात होईल. प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांनी येत्या दि. २३ ते ३१ जुलैपर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करावी. पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा student प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी ९३ हजार ९ बालकांना प्रवेश जाहीर झाला आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून, प्रवेश पात्र बालकांची निवड यादी व प्रतीक्षा यादी आरटीई पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत सोडत ७ जून २०२४ रोजी शिक्षण आयुक्त यांचे उपस्थितीत काढण्यात आलेली होती. मात्र, उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल झाल्याने प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर आता यादी प्रसिद्ध केली जात आहे. आरटीई प्रवेशासाठी २ लाख ४२ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला.
प्रवेशासाठी १ लाख ५ हजार २२३ जागा उपलब्ध आहेत. ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश प्रतीक्षा यादीत करण्यात आला आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील अधिकारी यांनी तपासणी करून पडताळणी केंद्रे अद्ययावत करण्यात यावीत.
पालकांनी केवळ “एसएमएस’वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज कमांक टाकून अर्जाची स्थिती पडताळावी, अशा सूचनाही प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी जारी केल्या आहेत. ऑनलाइन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.