पुणे- सेवाकुंडचा निर्धार, बनला पूरग्रस्तांचा आधार! समाजाचे देणे लागतो ही भावना ज्यांच्या अंतर्मनात जागी होती, अशा डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसाचा उत्सव हा केवळ केक, फुले किंवा शुभेच्छांचा नव्हता; तर तो होता समाजातील दुर्लक्षित घटकांना “उठा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” असे सांगणारा मानवी संवेदनांचा उत्सव.
लातूर जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सेवाकुंड ट्रस्ट तर्फे महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर, धाराशिव व नांदेड या पूरग्रस्त भागांमध्ये गोरगरिबांना धान्य, कपडे, घरगुती साहित्य तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. “समाजाने दिलेल्या प्रेमाचे ऋण फेडायचे असेल तर हात पुढे करावे लागतात” हे या उपक्रमातून जणू अधोरेखित झाले.
याच निमित्ताने लातूरमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
७८० लोकांची डोळ्यांची तपासणी
२९० गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप
शंभराहून अधिक नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया
हा उपक्रम म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजयच!
याशिवाय विविध गावांत महाआरोग्य शिबिरे घेऊन गरजूंना औषधोपचार व निदान सुविधा मोफत पुरवण्यात आल्या. समाजातील रक्तसंचयाची तूट लक्षात घेऊन ६२ हजार रक्त बाटल्या संकलित करण्याचा संकल्प सेवाकुंड ट्रस्टने केला असून याची सुरुवात संभाजीनगर येथून झाली. पुणे, सोलापूर, जालना, लातूर अशा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित करून हजारो स्वयंसेवकांनी उत्साहाने रक्तदान केले.
फक्त उपचारच नव्हे तर माणुसकीचा हात पुढे करत लातूर जिल्ह्यातील ५ अनाथ आश्रम व वृद्धाश्रमांचे संचालकांचे सन्मान करण्यात आले. तसेच या आश्रमातील वृद्ध व अनाथांना दिवाळीनिमित्त प्रेमाने फराळाचे वाटपही करण्यात आले.
“समाजाचे ऋण कधीच संपत नाही, पण ते फेडण्याचा प्रयत्न मात्र थांबता कामा नये,” असा मनाला भिडणारा संदेश देत हे कार्य अविरत सुरू राहील, असे आश्वासन सेवाकुंड ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजीत गायकवाड यांनी दिले.


