पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीची(Pimpri Chinchwad Shehar Vikas Aaghadi) महत्त्वपूर्ण बैठक भोसरी MIDC येथे पार पडली. आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अभय भोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील वाढत्या नागरी समस्या, औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती आणि स्थानिकांच्या हक्कांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.

अध्यक्ष अभय भोर (bhayBhor)यांनी सांगितले की, शहराचा निर्णय शहरातील लोकांनीच घ्यावा हा यामागील मुख्य हेतू आहे. “पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा औद्योगिक ओळख मिळवून देण्याची वेळ आली आहे. बेरोजगारी कमी करणे, उद्योगांचे रक्षण करणे आणि युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे विकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीत थेट उतरत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
बैठकीत शहरातील रोजगार, मूलभूत सुविधा आणि स्थानिकांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यात आले.
महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार
पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे करणार आहे.
आघाडीने स्पष्ट केले की शहराची दिशा आणि निर्णय क्षमता आता स्थानिक नागरिकांकडे परत जाण्याची गरज आहे.
प्रत्येक प्रभागात स्टार्टअप उद्योग
महिलांसाठी घराजवळ रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून प्रत्येक प्रभागात छोटे-मोठे स्टार्टअप उद्योग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून महिला स्वावलंबनाला गती मिळणार आहे.
युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र
शहरातील बेरोजगार युवक–युवतींसाठी प्रत्येक भागात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे रोजगारक्षमता वाढून शहराचा औद्योगिक दर्जाही उंचावेल.
जमीन, सर्वेक्षण आणि नुकसानभरपाई विषयांवर सक्त भूमिका
शासनाने घेतलेल्या स्थानिकांच्या जमिनी, सर्वेक्षणातील तफावत आणि नुकसानभरपाईतील अन्यायाविरोधात आघाडी कठोर भूमिका घेणार आहे. प्रभावित नागरिकांना न्याय मिळावा यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा दिला जाईल.
मूलभूत नागरी सुविधांवरील जोर
शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूककोंडी, सार्वजनिक सुविधा आणि प्रदूषण या ज्वलंत नागरी समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
कामगार हक्कांचे संरक्षण, महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.
बैठकीला फुगेवाडी, दापोडी, भोसरी, दिघी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, काळेवाडी, मोशी, कासारवाडी यांसह अनेक भागांतील मान्यवर, उद्योजक, कामगार प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
शेवटी, अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले की आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सविस्तर रणनीती तयार करण्यासाठी दुसरी मोठी बैठक लवकरच बोलावली जाणार आहे. या बैठकीत उमेदवारांची निवड, प्रचार आराखडा आणि धोरणात्मक कार्यक्रम जाहीर करण्यात येतील.


