पुणे -पाणी समस्या ही देशातील सर्वात मोठी समस्या असून सामाजिक संस्थांची योग्य साथ, प्रशासनाचे भक्कम पाठबळ आणि लोकसहभाग या जोरावर देशातील पाणी समस्येवर मात करता येते, याचे आदर्श उदाहरण भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि आयएएस चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लोकसहभागातून जलसमृद्ध ‘बुलढाणा मॉडेल’ उभारले आहे, असे गौरवोद्गार भारताचे जी-२० शेर्पा अमिताभ कांत यांनी काढले.
भारतीय जैन संघटना आयोजित बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, नॅशनल वॉटर हेड सपना सिंग, मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी अमिताभ कांत यांनी बीजेएस वॉटर कंट्रोल रूमला भेट देऊन देशभर सुरू असलेल्या-झालेल्या कामांची लाईव्ह डॅशबोर्डद्वारे पाहणी केली.
अमिताभ कांत पुढे म्हणाले, “शांतिलाल मुथ्था-बीजेएसची समर्पित सामाजिक बांधिलकी आणि एक प्रशासकीय अधिकारी काय करू शकतो, हे बुलढाणा मॉडेलने दाखवून दिले. यातून प्रेरणा घेऊन पुलकुंडवार यांच्यासारखे अधिकारी आणि बीजेएससारख्या संस्था पुढे आल्या, तर देशातील पाणी समस्यावर मात करता येईल, असा विश्वास वाटतो.”
पुलकुंडवार म्हणाले, “२०१७-१८ साली बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी शांतिलाल मुथ्था यांच्याशी चर्चा करून तलावातील गाळ काढण्याची कल्पना मांडली. त्यांनी यास त्वरित होकार देऊन तत्कालीन मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, अधिकार्यांसोबत बैठक झाली आणि पुढे मान्यता मिळवून कामाला सुरुवात केली. बीजेएस सहकार्याने तसेच लोकसहभागातून जिल्ह्यातील तलावांमधील गाळ काढला. शेतकर्यांनी स्वखर्चाने तो गाळ आपल्या शेतात टाकला. यातून बुलढाणा पॅटर्न उभा राहिला, याचा मला अभिमान आहे.”
शांतिलाल मुथ्था म्हणाले, “चार दशकांपासून बीजेएस समर्पित भावनेने कार्यरत आहेच, पण देशातील पाणी संकटाचा सामना करण्यासाठी बीजेएस शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून पूर्ण झोकून देऊन काम करेल आणि त्यासाठी अमिताभजी कांत यांचे नेहमीसारखेच सहकार्य मिळेल, यात शंका नाही.”