पुणे, : पुणे मेट्रोच्या पीसीएमसी-निगडी मार्गावरील पहिल्या खांबाच्या पायाचे काँक्रीटच्या (Piller foundation concrete) कामाला अण्णाभाऊ साठे पीएमपीएमल बस आगार, निगडी येथे भक्ती-शक्तीजवळ सुरुवात झाली. सर्व आवश्यक भू-तपासण्यांनंतर हा महत्त्वपूर्ण या कामाला सुरुवात करण्यात आली. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री श्रावण हर्डीकर, पीसीएमसीचे आयुक्त श्री. शेखर सिंग, संचालक श्री. अतुल गाडगीळ, संचालक श्री. विनोद अग्रवाल, कार्यकारी संचालक प्रशासन आणि जनसंपर्क डॉ. हेमंत सोनवणे आणि इतर मेट्रो आणि पीसीएमसी व पीएमपीएमलचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उत्तर-दक्षिण मार्गिकेवरील पिंपरी चिंचवड ते निगडी (भक्ती शक्ती चौक) या ४.५१९ किमी लांबीच्या उन्नत मार्गिकेच्या व्हायाडक्टचे काम दिनांक १५ मार्च २०२४ रोजी रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) या कंपनीला देण्यात आले आहे. हा प्रकल्प १३० आठवड्यांत पूर्ण होणार आहे आणि त्यात चार स्थानके असतील: चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती. या मार्गाच्या व्हायडक्त बांधकामासाठी १५१ स्पॅन आणि ११८१ सेगमेंट ची आवश्यकता लागणार आहे. RUNL ने तळेगाव जवळ सेगमेंट व गर्डर बनावीन्याला सुरुवात केली आहे.
हा विस्तार पुणे मेट्रो फेज-१ च्या मार्गिका -१ चा नैसर्गिक विस्तार आहे. याचा उद्देश सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे आणि प्रवासी संख्या वाढवणे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या कार्यक्षेत्रात स्थित, ज्याला “इंडियाज मोटर सिटी” म्हणून ओळखले जाते अश्या भारतातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक असणाऱ्या क्षेत्राच्या विविध गरजा ही मार्गिका पूर्ण करेल. या क्षेत्रांत असंख्य ऑटोमोटिव्ह आणि संबंधित MSME कंपनी आहेत.
विस्तार मार्ग पिंपरी चिंचवड क्षेत्रातील प्रमुख भागांना जोडेल. चिंचवड स्थानक व्यावसायिक, निवासी, औद्योगिक आणि धार्मिक स्थळे आणि चिंचवड भारतीय रेल्वे स्थानकाशी जोडण्यात येईल. आकुर्डी स्थानक निवासी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांची पूर्तता करेल; निगडी आणि भक्ती-शक्ती स्थानके निवासी, मनोरंजन आणि धार्मिक स्थळे जोडलीत आणि देहू, चिखली, तळेगाव आणि वडगाव यांसारख्या निमशहरी भागांना जोडणाऱ्या शहर बस आगारांशी जोडण्यात येतील.
पीसीएमसी आणि पुणे या शहरांच्या दरम्यान लोकांची लक्षणीय प्रवासी हालचाल होत आहे आणि या नवीन मेट्रो विभागामुळे देहू, चिखली, तळेगाव आणि वडगाव यांसारख्या उपनगरी भागातील अनेकांना तसेच पीसीएमसी, निगडी आणि आकुर्डी येथील रहिवाशांना सुधारित कनेक्टिव्हिटी मिळाल्याने फायदा होणार आहे. पुण्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागात बसेस, रिक्षा, ई-रिक्षा, सायकली आणि ई-बाईकसह फीडर सेवा या मेट्रो स्थानकांसोबत जोडल्याने प्रवाशांना याचा मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे. पुणे मेट्रो ‘मल्टी -मोडल ट्रान्झिट सिस्टीम’ चा वापर प्रवाश्यांच्या सोयीसाठी करत आहे. पुणे मेट्रो कमी वेळात, सुरक्षित कमी खर्चात आणि पर्यावरणास अनुकूल प्रवासी सेवा देत आहे, त्यामुळे रहिवाशांच्या जीवनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हे एक भरभराटीचे शहरी केंद्र आहे, ऑटोमोबाईल आणि IT क्षेत्रात वेगाने औद्योगिक वाढ होत आहे आणि मोठ्या कंपन्यांना आकर्षित करत आहे. शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुनियोजित रस्त्यांचे जाळे, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेद्वारे कनेक्टिव्हिटी आणि आगामी मेट्रो मार्गिका यांचा समावेश आहे. पीसीएमसी-निगडी हा भाग औद्योगिक आणि निवासी क्षेत्रांना जोडतो आणि त्यात उच्च शैक्षणिक संस्था, प्रगत आरोग्य सुविधा, व्यावसायिक केंद्रे, शॉपिंग मॉल्स आणि सुनियोजित निवासी संकुले आहेत. निगडी बसस्थानक आणि आगामी मेट्रो मार्ग प्रवासाची कनेक्टिव्हिटी वाढवतात, ज्यामुळे ते एक महत्त्वपूर्ण वाहतूक केंद्र बनते.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री.शेखर सिंह म्हणाले, “पीसीएमसी ते निगडी या विस्तारित मार्गाच्या कामाची आज सुरुवात होत आहे. या मार्गामुळे या विभागातील मोठ्याप्रमाणात असणारा रहिवासी भाग, कारखाने, शाळा, कॉलेज मेट्रोने जोडले जाणार आहेत. या मार्गाच्या कामासाठी पीसीएमसी तर्फे सर्वोप्तरी मदत करण्यात येईल.”
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर म्हणाले, “पीसीएमसी ते निगडी या विस्तारीत मार्गामुळे या परिसरातील रवासी भाग मेट्रोद्वारे जोडले जाणार आहेत. नियोजित १३० आठवड्याच्या वेळात हे काम पूर्ण करण्यासाठी मेट्रोने नियोजन केले आहे. आणि त्या अनुषंगाने वेगाने काम सुरु केले आहे.”