पुणे : ‘फ्रीमेसनरी’ या समुदायाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची संधी पुणेकर नागरिकांना मिळणार आहे. येत्या रविवार दि. ०२ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान कॅम्प परिसरात पुणे रेस कोर्स जवळील ६ ए एक्झिबिशन रस्ता येथे फ्रीमेसनरी हॉल या ठिकाणी हे ओपन हाऊस होणार असून यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.
इंग्लंडच्या युनायटेड ग्रँड लॉजच्या अंतर्गत दी लेस्ली विल्सन लॉज नं ४४८० यांच्या वतीने सदर ओपन हाऊसचे आयोजन करण्यात आले असून फ्रीमेसनरी समुदायासंदर्भात सकाळी १०.३०, आणि दुपारी १२:३० या वेळांमध्ये “ओपन हाऊस”open house दरम्यान उपस्थितांना प्रास्ताविकपर माहिती देखील देण्यात येणार आहे.

या विषयी अधिक माहिती देताना डिस्ट्रीक्ट डेप्युटी ग्रँड मास्टर असलेले देवेश हिंगोरानी म्हणाले, “फ्रीमेसनरी समुदायाबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने आम्ही या ओपन हाऊसचे आयोजन केले असून या वेळी सामान्य नागरिक लॉजच्या परिसरात प्रत्यक्ष फेरफटका मारू शकतात. इतकेच नाही तर फ्रीमेसनरी, त्यांचे प्रतीकवाद (सिंम्बॉलिझम) व आजच्या काळातील संदर्भ या बद्दलही यावेळी माहिती देण्यात येईल.”
याबरोबरच त्याच स्थळी व वेळी, नयन आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले असून यामध्ये डोळ्यांची विनाशुल्क तपासणी करुन घेता येईल असेही हिंगोरानी यांनी सांगितले.
पुणे विभागासंदर्भात अधिक माहिती –
बॉम्बे प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर एच. ई. सर लेस्ली ओर्मे विल्सन यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावे पुण्यातील लेस्ली विल्सन लॉजची उभारणी ही ३ नोव्हेंबर १९२६ रोजी करण्यात आली. अनेक मोठे उद्योजक, व्यवसायिक, व्यवस्थापकीय संचालक, चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, डॉक्टर, वकील आणि उच्च दर्जावर कार्यरत अधिकारी, व्यावसायिक यांचा या समुदायामध्ये समावेश आहे. काही प्रसिद्ध भारतीय फ्रीमेसन्समध्ये स्वामी विवेकानंद, फिरोजशाह मेहता, पंडित मोतीलाल नेहरू, सर दोराबजी जमशेदजी टाटा, डॉ. सी. राजगोपालाचारी, सर सुलतान मोहम्मद शाह आगा खान, महाराजा दुलीप सिंग, महाराजा जिवाजी राव सिंदिया, अभिनेते डेव्हिड अब्राहाम, क्रिकेटपटु मन्सुर अली खान पतौडी यांचा समावेश होतो.
फ्रीमेसनरी या समुदायाबद्दल –
चरित्रसंपन्न पुरुषांची जगातील सर्वांत जुनी संस्था म्हणून फ्रीमेसनरी हा समुदाय ओळखला जातो. इंग्लंड, वेल्स, अनेक द्वीपसमूह यांबरोबरच जगभरातील आयल ऑफ मॅन आणि भारतासह परदेशातील जिल्ह्यांमध्ये फ्रीमेसनरीची प्रशासकीय संस्था म्हणून युनायटेड ग्रँड लॉज ऑफ इंग्लंड (UGLE) काम पाहते. इ. स. १७१७ मध्ये याची स्थापना झाली असून जगातील सर्वात जुने ग्रँड लॉज म्हणून ते ओळखले जाते. आज या लॉजच्या अंतर्गत जगभरातील तब्बल १० हजार लॉज कार्यरत असून जगभरात समुदायाचे ४ लाख सदस्य आहेत.