पिंपरी, – विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला शेती व उद्योजकतेच्या माध्यमातून चालना देणे आवश्यक आहे. विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी उद्योग क्षेत्रात तरुणांबरोबरच महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु)pimpari chinchawad univercity, गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने, बालेवाडी येथे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ मध्ये उद्घाटनाच्या द्वितीय सत्रामध्ये चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.

“विद्यापीठे आणि व्यावसायिक संस्थांमध्ये भागीदारीद्वारे उद्योजकता, संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे” या चर्चासत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी मंत्री व पीसीयूचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील, डॉ. अभय जेरे (उपाध्यक्ष, एआयसीटीई), डॉ. विनोद मोहितकर (संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र शासन), डॉ. शैलेंद्र देवळणकर (संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र शासन), डॉ. समीर मित्रगोत्री (हार्वर्ड विद्यापीठ), डॉ. नील फिलीप (ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेज, न्यूयॉर्क), डॉ. परनिता सेन आणि डॉ. मुकुंद कर्वे (रटगर्स विद्यापीठ, यूएसए) आदींनी सहभाग घेतला.
उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे उपाध्यक्ष सचिन इटकर, उपकुलगुरू डॉ. मणिमाला पुरी आणि प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे आदी उपस्थित होते.
या ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये शंभर पेक्षा जास्त एनआरआय मराठी उद्योजक, वक्ते, संशोधक, शास्त्रज्ञ, १२० स्टार्टअपचे नवउद्योजक, गुंतवणूकदार अशा बाराशे पेक्षा जास्त व्यक्तींनी सहभाग घेतला होता.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आजच्या तरुणांना नवीन कौशल्ये शिकण्याची, उद्योजकता स्विकारण्याची आणि राष्ट्रीय विकासात योगदान देण्याची अधिक आवड आहे. यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठाने उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचा युवक युवतींनी आपले व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोग करून घ्यावा असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
उद्योजक होण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी युवकांनी आवश्यक कौशल्य आणि मानसिक दृष्ट्या सुसज्ज असले पाहिजे. यासाठी उच्च विचारसरणी आणि नवउपक्रमाचा ध्यास असणे आवश्यक आहे असे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी सांगितले.
हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधक डॉ. समीर मित्रगोत्री यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना सक्षमपणे उभे राहण्यासाठी जागतिक स्तरावरील कौशल्य आत्मसात करावी लागतील. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागतिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे. जागतिक दर्जाचे शैक्षणिक, व्यावसायिक वातावरण निर्माण करून दिले पाहिजे. भारतीय शिक्षण प्रणाली यूएसए, युके अशा प्रगत राष्ट्रांबरोबर स्पर्धा करू शकते. त्यासाठी आपल्या अभियंत्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करून आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करीत स्पर्धेत उतरले पाहिजे, यासाठी शासनाने देखील प्रोत्साहन पर योजना राबवल्या तर आपण निश्चितच विकसित भारतचे स्वप्न पूर्ण करू असेही डॉ. मित्रगोत्री यांनी सांगितले.
तसेच विद्यापीठे आणि व्यावसायिक संस्थांमधील भागीदारीवर लक्ष केंद्रित करून उद्योजकता, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी व्यावसायिक संस्थांमधील भागीदारीच्या महत्त्वावर या चर्चासत्रात भर देण्यात आला.