पुणे : आज संपूर्ण जग तंत्रज्ञानाने व्यापले आहे. तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटे देखील आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज तंत्रज्ञान बदलत आहे. सायबर गुन्ह्यांच्या हजारो तक्रारी देखील दाखल होत आहेत. आता घरफोडी, चोरी, दरोडा याचे प्रमाण कमी होऊन सायबर गुन्हयांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातर्फे ‘रेझिंग डे’ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) उत्तम भजनावळे, सायबर तज्ञ पुष्पक शहा, अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.
संभाजी कदम म्हणाले, उत्तम शिक्षित लोकांची सायबरमध्ये फसवणूक होत आहे. त्यामुळे आपण जागृत व्हायला हवे. समोर आलेल्या अमिषाच्या पाठीमागे जाऊन आपण अडकतो. त्याचा आपल्यासोबत कुटुंबाला देखील त्रास होत आहे. आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे.
दिलीप दाईगडे म्हणाले, महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनाच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस व जनता समन्वयासाठी असे कार्यक्रम उपयुक्त आहेत. यंदा मोबाईल फोन व सोशल मीडिया याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेतला आहे.
अॅड. शार्दूल जाधवर म्हणाले, आपल्या रक्षणासाठी जीवाचा त्याग करण्याची भावना ठेवून हे पोलीस कार्यरत आहेत. कोविड काळात पोलीस बांधवांनी खूप मोठे काम केले. त्यामुळे पोलीस बांधवांसाठी व कुटुंबासाठी संस्थेतर्फे आरोग्य शिबीर घेऊ. पोलीस बांधवांसाठी आरोग्यविषयक आपत्तीमध्ये मदत करण्याचा प्रयत्न संस्था करेल