समाजसुधारक, राजकीय कार्यकर्ता, पत्रकार आणि क्रांतिकारी भावना असलेल्या कट्टर राष्ट्रवादी असे व्यक्तिमत्व म्हटल्यास बाळ गंगाधर टिळक यांची प्रतिमा डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही. लोकमान्यांनी भारतीय राष्ट्रवादाची ज्योत पेटवली. ते केवळ राजकीय कार्यकर्ते आणि समाजसुधारक नव्हते तर हिंदुत्वाचे “ चॅम्पियन “ होते. ” लोकमान्य ” या उपाधीचा अर्थ ” जनतेने स्वीकारलेले ” असा आहे. कारण लोकमान्य टिळक हे आधुनिक भारताचे पहिले जननेते होते. त्यांच्या अनेक गोष्टींचे अनुकरण मोठ्या प्रमाणात झाले होते. जेंव्हा इतर नेते “अंशतः राजवटीची मागणी करत होते तेंव्हा टिळकांनी ” संपूर्ण स्वराज ” ची हाक दिली होती. चला तर मग, या बहुआयामी नेत्याच्या जीवनाचा शोध घेऊ आणि त्यांनी राष्ट्राचे नशीब कसे घडवले ते जाणून घेवू
स्वातंत्र्यपूर्व काळातही हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करण्यात टिळकांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांचा तसा सामाजिक सुधारणांना विरोध नव्हता, पण त्यांचा पाश्चात्य सुधारकांनी सुचवलेल्या सुधारणांच्या पद्धतींना विरोध होता. त्यांचे राजकीय तत्वज्ञान भारतीय परंपरांमध्ये रुजलेले असले तरी आधुनिकीकरणाला त्यांचा विरोध नव्हता. हिंदू धर्म, सामाजिक-राजकीय सुधारणा, राष्ट्रवादी इत्यादींबद्दल त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा इथे घेता येईल.
अ. टिळक, हिंदुत्वाचे कट्टर ध्वजवाहक
१. हिंदू सणांचे पुनरुज्जीवन:
स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेला चालना देण्यासाठी राजकीय सभा आणि मेळावे यांची कठोर तापांनी ब्रिटीशांकडून होत होती. टिळकांनी वसाहतविरोधी माहिती प्रसारित करण्यासाठी आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रीय भावनांनी सण साजरे करण्यास सुरुवात केली. त्यांनी गणेश चतुर्थी हा सण केवळ भारताच्या स्वातंत्र्यासाठी केवळ लोकांना एकत्र आणण्याची संधी म्हणूनच पाहिले नाही तर हिंदूंमध्ये अभिमानाची भावना वाढवण्याची आणि त्यावेळच्या हिंदू समाजाला जातीवादाने ग्रासलेल्या बेड्या तोडण्याची आणि हिंदू पुनरुज्जीवनवादाची संधी असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी जात, वर्ग आणि धार्मिक भेदांच्या पलीकडे जाऊन सर्व स्तरातील लोकांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. म्हणून, त्यांनी 1893 मध्ये आपल्या भाषणातून, वृत्तपत्रांतून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
दुसरा सार्वजनिक उत्सव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती.1894 मध्ये, आर.पी. करकेरिया यांच्या एका निबंधात छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापगडच्या लढाईच्या सभोवतालच्या ब्रिटीश-प्रभावित कथेला आव्हान देण्यात आले. यामुळे ऐतिहासिक सत्य आणि राष्ट्रीय अभिमान यावर सार्वजनिक चेतना जागृत झाली. त्यामुळे त्यांनी केसरी या वृत्तपत्रातून रायगडावरील शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या दुर्लक्षित अवस्थेकडे लक्ष वेधले. आपल्या राजांचा , आपल्या जननायकाचा वारसा जपण्यात महाराष्ट्रीयनांच्या निष्क्रियतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे जीर्णोद्धाराच्या प्रयत्नांबद्दल आणि शिवाजी महाराजांचा सन्मान करण्यासाठी वार्षिक उत्सव साजरा करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. लोकमान्य टिळकांचा असा विश्वास होता की राष्ट्रीय वीरांच्या स्मरणाने आपलेपणा आणि राष्ट्रीय अस्मितेची भावना वाढीस लागते. ही भावना दृढ करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी शिवाजी जयंती (शिवजयंती) सार्वजनिक उत्सव मोलाचा ठरेल हे टिळकांनी जाणले होते.
टिळक लिहितात, “राष्ट्रामध्ये आपलेपणाची जागरूकता राहण्यास त्या त्या राष्ट्रातील पूर्वी झालेल्या पराक्रमी पुरुषांचे आम्हास नेहमी स्मरण झाले पाहिजे किंवा दिले पाहिजे, हे तत्त्व सगळ्या जीवंत राष्ट्रास हल्ली पूर्णपणे मान्य झालेले आहे. आम्हीच जर ते विसरलो असलो, तर ते आमच्या निद्रावस्थेचे अगर दुर्दैवाचे लक्षण होय. परंतु, शिवाजी महाराजांचे स्मारक आम्ही मोठ्या कळकळीने व भक्तीने का करावे, याबद्दल याहीपेक्षा बलवत्तर कारण म्हणजे आमची, आमच्या राष्ट्राच्या अभ्युदयाचा पाया घालणार्या गृहस्थाबद्दलची कृतज्ञताबुद्धी ही होय. ज्याच्या अंगात माणुसकी वास करीत आहे, त्यास श्री शिवाजीमहाराजांच्या समाधीबद्दल आस्था वाटेलच; पण ज्याचा महाराष्ट्र कुळात जन्म झाला आहे, त्यास तर असल्या कृत्याबद्दल विशेष अभिमान, आस्था कळकळ किंवा भक्ती असणे हे त्याचे कुलव्रतच होय.” (केसरी-२ जुलै १८९५)
२. गीता रहस्य
टिळकांनी श्रीमद भगवद्गीता रहस्य लिहिले, ज्याला गीतारहस्य किंवा कर्मयोग शास्त्र म्हणूनही ओळखले जाते. जेव्हा ते बर्मा इथल्या मंडाले इथल्या तुरुंगात होते तेंव्हा त्यांनी निर्मिलेले हे पुस्तक कर्मयोगावर विशेष लक्ष केंद्रित लिहिलेले भगवद्गीतेचे ‘ डीकोडिंग ‘ ज्यामध्ये ‘कृती’ या घटकाला महत्त्व दिले आहे. यात दोन भाग आहेत – तात्विक प्रदर्शन , त्याचे भाषांतर आणि भाष्य. टिळक मंडालेच्या तुरुंगात सुमारे सहा वर्षे असले तरी, 400 पानांचे असलेले हे पुस्तक चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण झाले. टिळकांच्या विवेचनाचा मध्यबिंदू, जो भगवद्गीतेचा मध्यबिंदू होता, त्याला काळाचा विशेष संदर्भ आहे. जेव्हा त्यांनी हे पुस्तक लिहिले तेव्हा संपूर्ण भारत ब्रिटीश राजवटीखाली वावरत असताना निष्क्रियतेला समूळ नष्ट करण्याची वेळ आली होती. या पुस्तकाचा उद्देश भारतीयांना जागृत करणे आणि त्यांना ‘कृती’च्या नैतिक मूल्याची जाणीव करून देणे हा होता आणि ती काळाची गरज होती. कोंडीत सापडून रणांगणावर निष्क्रीय झालेल्या अर्जुनला जागृत करण्याच्या उद्देशाने भगवद्गीतेचा जन्म झाला. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्याद्वारे, सक्रिय तत्त्व किंवा कृतीच्या नैतिक दायित्वाचे रक्षण केले. हिंसक कृती जोपर्यंत नि:स्वार्थी आणि वैयक्तिक स्वार्थ किंवा हेतू नसलेली असेल हेच त्या माध्यमातून त्यांनी सांगितल्याचं दिसून येतं. पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेला पैसा टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दान केला. त्याचप्रमाणे पुस्तकात मांडलेल्या तत्त्वज्ञानाला ते कालबाह्य होईल अशी तारीख देता येत नाही.
३. वेदांसाठी त्यांचे कार्य
टिळकांनाही वेदांमध्ये फार कमी पण लक्षणीय रस होता. भारतातील अग्रगण्य संस्कृत विद्वानांपैकी एक म्हणून, ते मेटाफिजिक्स, धर्म, खगोलशास्त्र आणि इतर संबंधित क्षेत्रांवरील शास्त्रीय साहित्याचा अभ्यास करण्यात सक्षम होते. त्यांनी ग्रंथांमधील खगोलशास्त्रीय संदर्भांचा वापर करून वेदांचा नेमका काळ लक्षात घेण्यासाठी नवीन पद्धती प्रस्तावित केल्या. त्यांनी ऋग्वेदात नमूद केलेल्या ताऱ्यांच्या स्थानांचे विश्लेषण केले. “ओरियन: स्टडीज इन द ॲन्टिक्विटी ऑफ वेद” हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध काम आहे. त्यात वेदांचा काळ निश्चित करण्याचा विषय हाताळला गेला. टिळकांचा असा विश्वास होता की ‘मॅक्स म्युलरने भाषिक संशोधनावर वेदांचा काळ ठरवला होता, तो योग्य नव्हता आणि संशोधनाची ही पद्धत एकतर्फी होती ’. म्हणून त्यांनी दैवी ग्रंथ, भाषाशास्त्र, विविध संहिता आणि वेदातील ब्राह्मण यातील ज्योतिषशास्त्राचे सर्व संदर्भ एकत्र केले आणि वेदांचा काळ 4500 ईसापूर्व ठरवला. या पुस्तकाने त्यांना प्राच्यविद्येतील अभ्यासक म्हणून ओळख मिळवून दिली. “द आर्क्टिक होम ऑफ वेद” हे त्यांचे दुसरे पुस्तक होते. खगोलशास्त्रीय आणि भूगर्भशास्त्रीय माहितीच्या आधारे त्यांनी या पुस्तकात असे सुचवले की आर्य मूळचे आर्क्टिक प्रदेशातील होते.
ब. प्रखर राष्ट्रवाद आणि समाज सुधारक
टिळकांचा असा ठाम विश्वास होता की, लोकांमध्ये एकतेची भावना आणि त्यांच्या देशाच्या वारशाचा अभिमान ही राष्ट्रवादाची महत्त्वपूर्ण शक्ती आहे. त्यांचा असा विश्वास होता की लोकांमध्ये समान हितसंबंध जोपासण्याद्वारे राष्ट्रवाद विकसित केला जाऊ शकतो आणि एकत्रित कृतीतून ते साकार केले जाऊ शकते. येथे त्यांच्या योगदानाबाबत उहापोह करता येईल :
संपूर्ण स्वराज्य (स्वराज्य) :
टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ समर्थक मानले जातात. भारतीय समाजाला ग्रासलेल्या बहुतेक वाईट गोष्टी परकीय वर्चस्वाचा परिणाम असल्याचे त्यांचे मत होते. टिळकांच्या मते सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे स्वराज्याची प्राप्ती हे सर्व लोकांच्या एकत्रित प्रयत्नातूनच साध्य होऊ शकते. टिळकांच्या दृष्टीने स्वातंत्र्य/स्वराज्य हे समाजसुधारणेपेक्षा महत्त्वाचे कार्य होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक सुधारणा सुरू केल्या जाऊ शकतात असा त्यांचा विश्वास होता. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” हे त्यांचे मराठीतील उद्गार, स्वराज्याच्या प्रबळ इच्छेला प्रज्वलित करून, भारतीय लोकांमध्ये खोलवर रुजले गेले आहेत.
राजकीय सक्रियता :
हिंदू धर्म आणि राष्ट्रवाद यांचा टिळकांच्या विचारात जवळचा संबंध असला तरी त्यांना केवळ जातीयवादी म्हणणे योग्य ठरणार नाही. हिंदू संघटित व्हावेत आणि त्यांची एकजूट अनन्यसाधारण राहावी अशी त्यांची इच्छा होती. भारतासारख्या बहुजन समाजात विविध धर्म आणि समुदायांना त्यांचे वैध स्थान असून राजकीय समस्यांबाबत ते वास्तववादी होते आणि राजकीय फायद्यासाठी धर्माचा दुरुपयोग करण्यास त्यांचा विरोध होता. राजकीय आणि इतर सवलती देऊन अल्पसंख्याकांना शांत करण्याच्या धोरणालाही त्यांचा विरोध होता; कारण अशा परिस्थितीत अल्पसंख्याकांना कायम अल्पसंख्याक म्हणून राहायला आवडेल आणि कालांतराने ते लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्यासाठी पुरेसे शक्तिशाली बनतील.
वृत्तपत्रे ही शस्त्रे :
लोकांना शिक्षित करणे हा देशसेवेचा सर्वोत्तम मार्ग आहे असा त्यांचा विश्वास होता. म्हणून त्यांनी आपले जीवन शिक्षणासाठी समर्पित केले. तथापि, टिळकांना असे वाटू लागले की लहान मुलांना शिक्षण देणे पुरेसे नाही आणि वृद्धांनाही सामाजिक-राजकीय वास्तवाची जाणीव करून देण्याची गरज आहे. त्यामुळे १८८१ मध्ये त्यांनी इंग्रजीत ‘मराठा’ आणि मराठीत ‘केसरी’ ही दोन साप्ताहिके सुरू केली. टिळकांना पत्रकारितेची ताकद समजली. नंतरच्या काळात यांचे वृत्तपत्रात रुपांतर होवून ती ब्रिटीश राजवटीच्या विरोधातील खणखणीत मुखपत्रे बनली. या वृत्तपत्रांच्या प्रकाशनांनी सरकारवर निर्भयपणे टीका केली आणि स्वातंत्र्य लढ्याबद्दल सक्रियपणे जागृती केली.
स्वदेशी चळवळ: टिळक हे स्वदेशी चळवळीचे प्रमुख व्यक्तिमत्त्व आहे. या चळवळीने ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा आणि स्वदेशी म्हणजेच भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे समर्थन केले. त्यांचा विश्वास होता की स्वदेशी उत्पादनांमुळे केवळ ब्रिटीश अर्थव्यवस्था कमकुवत होणार नाही तर भारतात स्वावलंबन (स्वराज) देखील वाढेल. उदा. 1905 मध्ये रतनजी जमशेटजी टाटा आणि द्वारकादास धरमसे यांच्यासमवेत संचालक म्हणून लोकमान्य टिळक यांनी “द बॉम्बे स्वदेशी को-ऑपरेटिव्ह स्टोअर्स कंपनी लिमिटेड” ही भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देणारी कंपनी स्थापन केली.
स्त्री शिक्षण:
भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखणा-या ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेवर टिळकांनी टीका केली होती. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची सह-स्थापना केली. यामुळे भारतीय वारशाचा अभिमान जागृत करणारी आणि विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यासाठी सक्षम करणारी राष्ट्रीय शिक्षण प्रणाली स्थापन झाली. टिळक, नेहमी स्त्री शिक्षणाच्या बाजूने होते. भारतीय मुलींसाठी निवासी शाळा सुरू करणाऱ्या पंडिता रामाबाईंना टिळकांचा पाठींबा होता. त्यांची अट एवढीच होती की शिक्षण हे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असायला हवे होते. तथापि, 1889 मध्ये जेव्हा हे लक्षात आले की काही विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्माचे प्रशिक्षण दिले गेले तेव्हा रमाबाईंना टिळकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या विरोधात नाही; तर त्यांच्या ख्रिश्चन धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केला. शेवटी रानडे आणि भांडारकर यांनी टिळकांचा मुद्दा लक्षात घेतला आणि मान्य केला. 13 ऑगस्ट 1893 रोजी त्यांनी संस्थेचा राजीनामा दिला.