32.3 C
New Delhi
Sunday, July 13, 2025
Homeविश्लेषणपावसात वीज धोकादायक! महावितरणचं 'काळजी घ्या' आवाहन, टाळा गंभीर अपघात

पावसात वीज धोकादायक! महावितरणचं ‘काळजी घ्या’ आवाहन, टाळा गंभीर अपघात

पुणे,-: शहरी आणि ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर, महावितरणने नागरिकांना वीजसुरक्षेबाबत अत्यंत सतर्क राहण्याचे आणि योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पाणी हे विजेचे उत्तम वाहक असल्याने, पावसाळ्यात विजेच्या यंत्रणेपासून आणि उपकरणांपासून विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कुठे असतो धोका?

अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेकदा विजेच्या तारा तुटतात, खांब वाकतात किंवा लोंबकळतात. रस्त्यावरील पथदिवे, फिडर पिलर, रोहित्रांचे (ट्रान्सफॉर्मर) लोखंडी कुंपण आणि फ्यूज बॉक्समध्येही धोका असू शकतो. याशिवाय, घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड किंवा विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू यामुळे विद्युत अपघाताची शक्यता वाढते. तुटलेल्या किंवा लोंबकळलेल्या वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने, त्यांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नका, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

घरात आणि घराबाहेर घ्यायची खबरदारी:

  • घरात: पावसाळ्यात घरातील स्विचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांना ओलावा लागणार नाही याची काळजी घ्या. फ्यूज म्हणून तांब्याऐवजी अॅल्युमिनियम अलॉयची विशिष्ट तार वापरावी, जेणेकरून बिघाड झाल्यास वीजपुरवठा तात्काळ खंडित होईल. दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीज तारांपासून दूर ठेवा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नका आणि विजेच्या स्विचबोर्डला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्या. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्विचबोर्डवरून बंद करा.
  • घराबाहेर: पथदिवे किंवा विजेच्या खांबांना जनावरे बांधू नका. त्यांना दुचाकी टेकवून ठेवू नका किंवा चुकूनही हात लावू नका.
  • सोसायटी आणि इमारती: सोसायट्यांमधील पथदिव्यांचे अर्थिंग आणि वायरिंग सुस्थितीत असल्याची तपासणी नोंदणीकृत विद्युत कंत्राटदारांकडून करून घ्यावी. लोखंडी पत्र्याची घरे किंवा इमारतींमध्ये लोखंडी जिन्याचा वापर करत असल्यास, तेथील वीजयंत्रणेचे अर्थिंग व्यवस्थित असल्याची खात्री करा. घराच्या बाहेरील भिंतीवर किंवा लोखंडी पत्र्याच्या घराला ओल आल्यास, वायरचे इन्सुलेशन खराब होऊन भिंतीमध्ये विद्युतप्रवाह येऊ शकतो. हे टाळण्यासाठी वायरच्या इन्सुलेशनची पाहणी आणि दुरुस्ती आवश्यक आहे.

पुराचा धोका आणि संपर्क साधण्याचे मार्ग:

अनेक इमारतींच्या तळमजल्यावर वीजमीटर असतात आणि पावसाळ्यात तळमजल्यात पाणी साचून वीजमीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढते. अशा वेळी, संभाव्य धोका टाळण्यासाठी वीजपुरवठा बंद करून महावितरणशी तात्काळ संपर्क साधावा. पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागात, धोका टाळण्यासाठी महावितरणकडून संबंधित रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे.

वीजविषयक किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारींसाठी महावितरणचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. यासह, मोबाईल अॅप आणि www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारेही तक्रारी नोंदविण्याची सोय उपलब्ध आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
32.3 ° C
32.3 °
32.3 °
51 %
3.2kmh
100 %
Sat
33 °
Sun
39 °
Mon
37 °
Tue
37 °
Wed
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!