पुणे- अंतर्मनाच्या जगाची ओळख देणारे ज्ञान म्हणजे योग साधना आहे. मानवाचे शारीरिक व मानसिक संतुलन ठेवण्यासाठी हजारो वर्षापूर्वी पतांजली यांनी योगदर्शन ग्रंथ लिहिला आहे. आज त्याचे महत्व संपूर्ण जगाने ओळखल्यानंतर १७५ देशात योग साधना केली जात आहे. असे विचार योगगुरू मनोज पटवर्धन यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे १०व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून आयुष मंत्रालय आणि पतांजली योग पीठ यांच्या सहकार्याने कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात योग महोत्सवाचे आयोजन केले. महिला सशक्तिकरण ही संकल्पना या वर्षी ठेवण्यात आली होती.या प्रसंगी योगगुरू मनोज पटवर्धन लिखित प्राणायाम एक अमृतानुभव या पुस्तकाचे प्रकाशन विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी योगगुरू डॉ. मनोज पटवर्धन, माधुरी पटवर्धन, योगगुरू मारूती पाडेकर गुरूजी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे व स्कूल ऑफ पीस स्टडीचे अधिष्ठाता प्रा.डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
या प्रसंगी शेकडो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना योगाचे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले.
मनोज पटवर्धन म्हणाले, मानवतेसाठी योगा अत्यंत महत्वाचा तर आहेच पण यामध्ये एकसंधपणा आणि मानवतेचा अर्थ दडलेला आहे. निसर्गाने मानवला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे योग आहे.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये याचे ज्ञान योगसाधनेतून मिळते. यातून नम्रता, लिनता आत्मसात करता येते. शरीराचा प्रत्येक कण गंजण्यापेक्षा झिजणे बरे, त्यासाठी रोज योगसाधना करावी. योग साधनेतून स्वत्व, स्वधर्म आणि स्वाभिमान जागृत करता येतो. आज संपूर्ण विश्वाला शांतीची गरज असून ती ध्यान धारणेतूनच पूर्णत्वास येईल. त्यासाठी एमआयटीत स्थापन झालेली आध्यात्मिक प्रयोगशाळा ही संपूर्ण जगासमोर ठेवायची आहे.
मारूती पाडेकर गुरूजी म्हणाले, एमआयटीत ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. त्याचे स्वरूप आता मोठ्या प्रमाणात करू. येथे नित्य नियमाने योगासने घेणारी ही एकमेव संस्था आहे.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविकेत डॉ. विश्वनाथ कराड यांना अमेरिकेत मिळालेल्या डी.लिट पदवीची माहिती दिली. तसेच माइंड, बॉडी, सोल याविषयावर विवेचन केले.
प्रा.डॉ. शालिनी टोंपे यांनी सूंत्रसंचालन केले. प्रा. मृण्मय गोडबोले यांनी आभार मानले.