पुणे: पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा स्त्रियांमधील प्रचलित हार्माेनल विकार (इंडाेक्राईन डिसाॅर्डर) आहे. त्यामुळे वंध्यत्व केस गळणे, शरीरावर अनावशक केस उगवणे (हर्सुटिझम), वजन वाढणे यांसारख्या लक्षणांचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर आणि जीवनशैलीवर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे स्त्रिया तणाव, चिंता आणि नैराश्याला बळी पडू शकतात. म्हणून तणाव आणि पीसीओएस यांच्यातील परस्पर संबंध असून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर हे ओळखूनच त्यावर उपचार करण्यावर भर देत आहेत.
सप्टेंबर हा पीसीओएस जागरूकता महिना आहे. पीसीओएसमुळे स्त्रियांच्या अंडाशयाच्या कार्यामध्ये व्यत्यय येतो आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन हाेते. मुलांना जन्माला घालण्याच्या वयोगटातील महिलांपैकी अंदाजे 8-13% महिलांवर पीसीओएसमुळे परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. वाढलेली एंड्रोजन पातळी, अनियमित मासिक पाळी किंवा पॉलीसिस्टिक अंडाशयांची निर्मिती ही पीसीओएसचे काही लक्षणे आहेत.
याव्यतिरिक्त, पीसीओएस असलेल्या महिलेला तणाव असल्यास त्यांच्या कोर्टिसोल (शरीरातील एक तणाव संप्रेरक) या संप्रेरकाची पातळी आणखी वाढते. वाढलेली कोर्टिसोल पातळी टेस्टोस्टेरॉनचे या संप्रेरकांचे उत्पादन वाढवू शकते. त्याने त्यांच्यामध्ये हायपरअँड्रोजेनिझम (एक सेक्स हार्मोन) यामध्ये वाढ होते आणि पीसीओएस ची लक्षणे आणखी तीव्र होऊ शकतात. याशिवाय, पीसीओएसमुळे वंध्यत्व येऊ शकते. त्यामुळे स्त्रियांसाठी ही एक अतिशय तणावपूर्ण बाब आहे. पीसीओएस मुळे वंध्यत्व आलेल्या स्त्रियांमध्ये दुर्दैवाने अपराधीपणाची, अपयशाची भावना निर्माण होते.
तथापि, पीसीओएस चे निदान झाले असले तरीही नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे शक्य आहे. परंतु, त्यावर उपचार करणे हे आव्हानात्मक असल्याने एखाद्या प्रिय व्यक्तीने संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्त्रीला पाठिंबा देण्यासाठी सोबत असणे आवश्यक आहे.
“पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) वर उपचार करताना तणावाचे व्यवस्थापन करणे हा त्यामधील महत्त्वाचा घटक आहे. ताणतणाव आणि पीसीओएस मधील गुंतागुंतीमुळे स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्हीच्या उपचारासाठी कार्यक्षम धोरण अवलंबण्याचे महत्त्व अधोरेखित करते. पीसीओएस व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक म्हणून तणाव ओळखणे आणि त्याचे निराकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांना प्रभावी उपचारासोबत संतुलित आणि परिपूर्ण जीवन जगण्याचा आनंद मिळू शकतो.”
- डॉ. अमित पाटील, सहयोगी संचालक, स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ञ, आयव्हीएफ विशेषज्ञ तथा रोबोटिक सर्जन आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पीसीएमसी, पुणे.