पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वजण एकत्र आले आणि लढले तेव्हा देश स्वतंत्र झाला. तसेच ससूनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन काम केले तर संस्थेची होणारी बदनामी थांबेल आणि संस्थेच्या कार्याचा आलेख उंचावेल, असे मत ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.
अमनोरा येस फाउंडेशनचे प्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांच्या संकल्पनेतून गेल्या सहा वर्षांपासून अमनोरा येस फाउंडेशनतर्फे मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये medical सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ससूनचे healt अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी अधीक्षक यल्लपा जाधव, अमनोरा येस फाऊंडेशनचे विवेक कुलकर्णी उपस्थित होते.
वैयक्तिक सुखदुःख विसरून रुग्णांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या आणि रुग्णांसाठी अहोरात्र राबणाऱ्या रुग्णसेविकांना मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सविता दुधाने, माया सारवान, पार्वती वाघेला, अमिना शेख स्मिता तांबे, ताई शिंदे या रुग्णसेविकांचा सन्मान करण्यात आला. डिंपल ननावरे, रक्षिता अग्नीकर, श्वेता जाधव, नेहा ब्रह्मकर या विद्यार्थिनींना मीरा देशपांडे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
विवेक कुलकर्णी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती या मानवतेच्या पुजारीच आहेत. रुग्णालयात काम करणाऱ्या या मावशी निस्वार्थ भावनेने रुग्णांची सेवा करत असतात. यांचा व सन्मान करायला मिळणे हे आपले भाग्यच आहे असे त्यांनी सांगितले.
संगीता दुधाणे म्हणाल्या, या क्षेत्रात काम करून मला दहा वर्षे झाली आहेत. पण माझ्या कामाबद्दल माझा सन्मान कोणी केला नाही. अमनोरा येस फाउंडेशन ने जो सत्कार केला त्यामुळे अजून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णांना प्रेमाने आणि आदराने वागवले पाहिजे.
विद्यार्थिनी डिंपल ननावरे म्हणाली, वैद्यकीय क्षेत्रात काम करणे हे अत्यंत अवघड असून रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी एक प्रकारचा आधारच आम्ही असतो. त्यांच्याबरोबर आपुलकीने वागून त्यांना आजारातून मुक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे.