Blood donation camp पुणे -खा.डॉ. सौ. मेधाताई कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत “द फिनिक्स फाउंडेशन” तर्फे पुण्यात भव्य रक्तदान शिबिर आणि आयुष्मान भारत योजना अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. शिबिराचे आयोजन संस्थेच्या संस्थापक व अध्यक्षा यामिनी मठकरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला खासदार मेघाताई कुलकर्णी, मंदार रेडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यात वाढत्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर सामाजिक जबाबदारीचा उत्कृष्ट नमुना ठरले. “द फिनिक्स फाउंडेशन” च्या या प्रयत्नाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रक्तदानासोबतच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली आणि लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.

यामिनी मटकरी यांनी सांगितले की, “सामाजिक कार्य ही केवळ जबाबदारी नसून मनुष्यत्वाची खरी साधना आहे. आज रक्तदानासारख्या कार्यातून आपण कित्येक जिवांना नवसंजीवनी देत आहोत, हेच खरे मानवतेचे पूजन आहे त्यामुळे आम्ही असेच रक्तदान शिबिर पुढेही राबवणार आहोत असेही ते म्हणाले.
“द फिनिक्स फाउंडेशन” ही पुण्यातील एक सामाजिक संस्था असून, गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. समाजातील दुर्बल घटकांना बळ देणे, महिलांचे आरोग्य व मानसिक सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि रोजगार निर्मिती हे या संस्थेचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे.
संस्थेमार्फत कर्करोग, एचआयव्ही सारख्या गंभीर आजारांबाबत जनजागृती आणि समुपदेशन, महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य संवर्धन, बेरोजगार तरुण आणि महिलांसाठी रोजगार व व्यवसाय प्रशिक्षण, तसेच विशेष मुलांच्या पालकांना मार्गदर्शन अशा विविध योजना राबविल्या जातात.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, तसेच पर्यावरण विषयक जनजागृती मोहिमा हेदेखील या संस्थेचे महत्त्वाचे अंग आहे. याशिवाय नागरी समस्यांचे निराकरण, सामाजिक न्यायासाठी उपक्रम, आणि समुदाय विकासाच्या दिशेने कार्यरत राहणे हा संस्थेचा ध्यास आहे.
2023 मध्ये यामिनी अमोल मठकरी यांनी “द फिनिक्स फाउंडेशन” ची स्थापना केली. त्यांनी गुंतवणूक सल्लागार म्हणून व्यावसायिक कारकिर्दीबरोबरच समाजकारण हे ध्येय ठेवले आहे. संस्थेची अधिकृत नोंदणी होण्यापूर्वीच त्यांनी बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, सामाजिक जागरूकता निर्माण करणे अशा अनेक प्रकल्पांची सुरुवात केली होती. आज या संस्थेने अनेक प्रकल्प यशस्वीरित्या अंमलात आणले आहेत आणि भविष्यात आणखी व्यापक सामाजिक काम करण्याचे ध्येय ठेवले आहे.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे समाजात पुन्हा एकदा “सेवा हाच धर्म” या विचाराला बळ मिळाले आहे. “द फिनिक्स फाउंडेशन” चा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचे जिवंत प्रतीक ठरला आहे.


