पुणे, – “देशाच्या सीमांचे रक्षण जवान करतात, तर देशातील आरोग्याचे रक्षण सफाई कामगार करतात. त्यामुळे या कामगारांना ‘सफाई कामगार’ नव्हे, तर ‘स्वच्छता सैनिक’ म्हणून ओळख दिली गेली पाहिजे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. सुधाकर पणीकर यांनी केले.
ते श्रमिक पत्रकार भवन, पुणे येथे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे आयोजित सफाई कामगार सन्मान सोहळ्यात बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी संगीता तिवारी होत्या. कार्यक्रमात सफाई कामगार, त्यांच्या पाल्यांचा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला.
सन्मान, सशक्तीकरण आणि आंदोलनाचा निर्धार
डॉ. पणीकर म्हणाले, “आज स्वच्छता सैनिकांच्या मागण्यांकडे मनपा प्रशासन आणि शासनाने दुर्लक्ष केले आहे. यापुढे सर्वांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागेल. सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना योग्य तो सन्मान व आर्थिक सुरक्षाही द्यायला हवी.”
कार्यक्रमात सर्वोत्तम सफाई कामगार, कामगार नेते, तसेच दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल-श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रुक्मिणीबाई लालबिगे यांना ‘सर्वोत्तम माता पुरस्कार’, तसेच चिमुकली सर्पमित्र हर्षदा लोहिरे हिचाही विशेष सत्कार करण्यात आला.
“शहराच्या स्वच्छतेत स्वच्छता सैनिकांचे योगदान अमूल्य” – संगीता तिवारी
अध्यक्षीय भाषणात संगीता तिवारी म्हणाल्या, “कोरोना काळात स्वच्छता सैनिकांनी प्राणांपेक्षा कर्तव्य महत्त्वाचे मानले. त्यांचे योगदान शहरांच्या आरोग्यासाठी अमूल्य आहे. मात्र प्रशासन सातत्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे संघटितपणे कायदेशीर मार्गाने लढा देणे हेच पर्याय आहे.”
संघटनेच्या पुढाकाराची ठाम भूमिका – सतीश लालबिगे
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मनपा प्रशासनाच्या अडमुठ्या धोरणांविरोधात आवाज उठवत आलो आहोत. पुढील वर्षीपासून कामगारांना आर्थिक मदत, संसारोपयोगी वस्तू, आरोग्य सेवा आणि मुलांच्या शिक्षणासाठीही सहाय्य पुरवण्याचा आमचा निर्धार आहे.”
या वेळी डॉ. सुधाकर पणीकर यांचा ‘विशेष कर्मवीर पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन आणि उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिकेचे अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने, सचिव सूर्यकांत यादव, तसेच एमएमजी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. जितेंद्र वाईकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सफाई कामगार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.